
मुंबई, 7 डिसेंबर (हिं.स.)। गुगलने आपला ‘ईयर इन सर्च २०२५’ रिपोर्ट जाहीर केला असून, यंदा भारतीय युजर्सच्या आवडी-निवडी नेमक्या कुठल्या दिशेने गेल्या याचं स्पष्ट चित्र या यादीतून समोर आलं आहे. या वर्षी क्रिकेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मनोरंजन या तीन गोष्टी भारतीयांच्या सर्च पॅटर्नवर प्रचंड प्रभाव टाकताना दिसल्या.
या रिपोर्टनुसार, २०२५ मधील सर्वात जास्त ट्रेंडिंग सर्च म्हणून ‘इंडियन प्रीमियर लीग’ म्हणजेच आयपीएल अव्वल क्रमांकावर राहिलं. भारतात क्रिकेटचं असलेलं वेड लक्षात घेता, हा निकाल कोणालाही आश्चर्यकारक वाटणारा नाही. आयपीएल नंतर दुसऱ्या स्थानावर ‘जीईमीएनआय’ हा शब्द राहिला. गुगलचा एआय चॅटबॉट जीईमीएनआय लोकांमध्ये वेगाने लोकप्रिय होत असून, देशात एआयबाबतची उत्सुकता किती झपाट्याने वाढते आहे, हे या सर्च ट्रेंड्सवरून स्पष्ट होतं.
विशेष म्हणजे, टॉप ट्रेंडिंग सर्चच्या पहिल्या पाच क्रमांकांपैकी तीन सर्च थेट क्रिकेटशी संबंधित होते. आशिया कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि महिला विश्वचषक या स्पर्धांसाठी मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले. यावरून भारतात क्रिकेट केवळ खेळ नसून भावनिक नातं असलेला विषय आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
क्रिकेट आणि एआयसह इतर अनेक विषयांनीही लोकांचं लक्ष वेधून घेतलं. सैयारा, दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि महाकुंभमेळा यांसारख्या शब्दांचा देखील मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात आला. धार्मिक, सामाजिक तसेच मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विषय भारतीय युजर्समध्ये तितकेच महत्त्वाचे असल्याचं यावरून दिसून येतं.
एआय सर्चच्या बाबतीतही जीईमीएनआयने बाजी मारली. यानंतर ग्रोक, डीपसीक आणि पर्प्लेक्सिटी यांसारख्या एआय टूल्सचा मोठ्या प्रमाणावर शोध घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे चॅटजीपीटी या लोकप्रिय एआय टूलने या यादीत सातव्या क्रमांकावर स्थान मिळवलं, तर ‘चॅटजीपीटी घिबली आर्ट’ हा ट्रेंड आठव्या क्रमांकावर होता. यावरून लोकांचा कल केवळ माहिती मिळवण्यापुरता मर्यादित न राहता, एआयच्या क्रिएटिव्ह वापराकडंही वळलेला दिसतो.
गुगलच्या ‘ट्रेंडिंग ट्रेंड्स’ या विभागातही मनोरंजक बाबी समोर आल्या. सर्वाधिक ट्रेंडिंग ट्रेंड म्हणून ‘जीईमीएनआय ट्रेंड’ समोर आला. याशिवाय ‘घिबली ट्रेंड’, ‘3D मॉडेल ट्रेंड’ आणि ‘जीईमीएनआय साडी ट्रेंड’ हे सर्चेसही देशभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. एआयचा वापर फॅशन, डिझाइन आणि डिजिटल आर्टमध्ये कसा वाढतो आहे, हे या ट्रेंड्सवरून स्पष्ट होतं.
चित्रपट आणि टीव्ही शोस यांच्या बाबतीतही भारतीय युजर्सची उत्सुकता कायम राहिली.सैय्यारा, कांतारा: एक दंतकथा अध्याय 1, कुली, War 2 आणि सनम तेरी कसम हे चित्रपट सर्वाधिक सर्च झाले. तर टीव्ही आणि वेबसीरिज विभागात स्क्विड गेम, पंचायत, बिग बॉस, द बॅड्स ऑफ बॉलीवूड आणि पाताळ लोक या शोसनी सर्च लिस्टमध्ये आघाडी घेतली.
लोकेशन बेस्ड सर्चेसमध्ये या वर्षी लोकांनी प्रामुख्याने तातडीच्या आणि माहितीपुरत्या गरजांवर लक्ष केंद्रित केलं. भूकंप अपडेट्स, AQI पातळी, पिकलबॉल आणि सैयारा चित्रपट हे सर्च यामध्ये सर्वात जास्त पुढे राहिले. यावरून लोकांची आरोग्य, पर्यावरण आणि लाइफस्टाइलशी संबंधित जागरूकता वाढत असल्याचंही स्पष्ट होतं.
एकूणच, गुगलच्या ‘ईयर इन सर्च २०२५’ रिपोर्टमधून भारतीय डिजिटल युजर्सचं बदलतं मनोरंजन, तंत्रज्ञान आणि माहिती मिळवण्याचं स्वरूप समोर आलं आहे. क्रिकेटचं प्रेम, एआयबद्दलची वाढती उत्सुकता आणि मनोरंजन क्षेत्रातील सततचा रस हे सगळे ट्रेंड्स एकत्रितपणे भारतातील डिजिटल संस्कृतीचं जिवंत चित्र उभं करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule