
नाशिक, 7 डिसेंबर (हिं.स.)।
तालुक्यातील सारूळ येथील अवैध गौण खनिज उत्खननाबाबतचा प्रश्न कित्येक वर्षांपासून गाजत असताना श स्थानिक प्रशासनाने सारूळ येथील परवाना संपलेल्या सहा, तर परवाना नसताना अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्या ४ अशा १० जणांवर गौण खनिज उत्खनन अधिनियम १९५७अन्वये वाडीव-हे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. नाशिक तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी दीड महिन्यात स्थानिक प्रशासनाने तब्बल १७ कारवाया केल्या आहेत.
नाशिकचे तहसीलदार पंकजकुमार पवार यांनी सारूळ येथे केलेल्या कारवाईने गौण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. ग्राम महसूल अधिकारी अरुण फसाळे यांच्या फिर्यादीनुसार नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सारूळ येथे कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली आहे. गत कित्येक वर्षांत गुन्हे दाखल होण्याची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.
याबाबत तहसीलदार पंकजकुमार पवार यांनी सारूळ येथे तपासणीसाठी भेट दिली असता, मंजूर खाणपट्टयाचे उत्खनन सुरू असल्याचे तसेच काही खाणी बंद, तर काही खाणपट्ट्यांची तात्पुरत्या परवान्याची मुदत संपलेली असतानाही त्यांनी नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसताना सर्रासपणे अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पवार यांच्यासह महिरावणी मंडल अधिकारी राहुल काळे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पंचनामे केले आहेत.
प्रशासनाने दगड खान उत्खननासाठी लागणाऱ्या तात्पुरत्या परवान्याची मुदत संपलेली असताना व अधिकृत परवाना नसताना चोरट्या रीतीने गौण खनिज विक्री करण्याच्या उद्देशाने दगड खान उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करी करताना आढळून आले. त्यानुसार शरद अर्जुन नवले, रोहिदास लहानू नवले, शांताराम बहिरू जाधव, सुरेश केशव जैन, योगेश मोतीराम नवले, सोमनाथ यशवंत नवले, दीपाली अमोल मुसळे, हिराबाई वाळू नवले, भाऊसाहेब कचरू नवले आणि उषा भाऊसाहेब ढगे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. २७० ब्रास दगड गौण खनिज उत्खनन करून त्याची १ लाख ६२ हजार रुपयांची शासनास रॉयल्टी न भरता दगड गौण खनिज चोरी करताना कारवाईत आढळून आले
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV