
नाशिक, 7 डिसेंबर (हिं.स.)।
आगामी सिंहस्थ 66 किलोमीटर लांबीचा नाशिक परिक्रमा मार्ग सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत साकारला जाणार आहे. या रिंग रोडसाठी आवश्यक भूसंपादनास मान्यता प्राप्त झाली असून यासाठी मोजणी पूर्ण करून भूसंपादनासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, नाशिकचे तहसीलदार पंकज पवार, मुकेश कांबळे (दिंडोरी), अपर तहसीलदार अमोल निकम, महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील, उपभियंता प्रशांत सोनवणे, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विकास महाले, सचिन चिंतावार, समन्वयक गजानन धुमाळ, प्रकाश गायकवाड, विकास जाधव उपस्थित होते.
रिंगरोडसाठी शहरात एकूण 9 ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन करताना ज्याठिकाणी व्यावसायिकांचे नुकसान होत असेल, त्या भरपाईचे मूल्यमापन संबंधितविभागाकडून करून घ्यावे. भूसंपादनही एकाच वेळी करण्यासाठी समिती गठित करण्यात यावी. भूसंपादन करतांना प्रस्तावित विकास रस्त्यांवरील अतिकमणे काढण्याबाबत महानरपालिकेने कार्यवाही करावी. तसेच मार्गातील पोल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तरमहाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने येत्या 15 दिवसात रिंगरोडसाठी मोजणीचे एकूण 545 गटांच्या मोजणीसह पोटहिस्सा मोजणीही करावी. तसेच मोबदला प्रदान करण्यासाठी पोटहिस्सा धारकांचे संयुक्त बँक खाते उघडून संमतीपत्रही घेण्यात यावे. रिंगरोडसाठी जमीन मोजणी कामाला गती देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकरी प्रसाद यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV