नागरी विमान वाहतूक राज्यमंत्र्यांनी इंडिगोच्या व्यवस्थापनाला धरले जबाबदार
नवी दिल्ली, ७ डिसेंबर (हिं.स.)नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमान वाहतूक क्षेत्रातील अलिकडच्या मोठ्या व्यत्ययासाठी इंडिगो एअरलाइन्सच्या व्यवस्थापनाला थेट जबाबदार धरले आहे. मोहोळ यांनी रविवारी माध्यमांना सांगितले की, इंडिगोने फ
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ


नवी दिल्ली, ७ डिसेंबर (हिं.स.)नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमान वाहतूक क्षेत्रातील अलिकडच्या मोठ्या व्यत्ययासाठी इंडिगो एअरलाइन्सच्या व्यवस्थापनाला थेट जबाबदार धरले आहे.

मोहोळ यांनी रविवारी माध्यमांना सांगितले की, इंडिगोने फ्लाइट ड्युटी टाइम लिमिट (FDTL) मधील बदल गांभीर्याने घेतले नाहीत, ज्यामुळे अलिकडच्या काळात देशभरात गोंधळ निर्माण झाला. एअरलाइन्सचा ड्युटी टाइम १० तासांवरून ८ तासांपर्यंत कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने या बदलाला मान्यता दिली होती.

राज्यमंत्र्यांनी सांगितले की, मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना १ जुलै २०२५ आणि १ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन टप्प्यात न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार FDTL लागू करण्याचे निर्देश दिले होते. इंडिगोने हे गांभीर्याने न घेतल्यामुळे हे संपूर्ण संकट निर्माण झाले.

मंत्री मोहोळ यांनी सांगितले की, परिस्थिती बिघडल्यानंतर मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) यांनी लगेचच कारवाई सुरू केली. चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, २४/७ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

हवाई सेवा लवकरात लवकर सुरू करता याव्यात यासाठी FDTL लागू करण्याचा आदेश फेब्रुवारी २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. DGCA ने इंडिगोच्या सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि २४ तासांच्या आत उत्तर मागितले आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, जनतेचा रोष योग्य आणि स्वाभाविक आहे. त्यांनी आश्वासन दिले की, सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे. आणि चौकशी समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी असेही सांगितले की या क्षेत्रात सुधारणा दिसून येत आहेत आणि सरकार शक्य तितक्या लवकर देशातील हवाई सेवा पूर्ववत करण्यासाठी काम करत आहे.यापूर्वी, इतर विमान कंपन्यांच्या वाढलेल्या विमान भाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'भाडे यादी' जाहीर करण्यात आली आहे.

या संकटामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी DGCA ने अनेक तात्काळ निर्णय घेतले आहेत. ज्यात रद्दीकरण शुल्काशिवाय प्रवाशांचे पैसे परत करणे आणि ४८ तासांच्या आत त्यांचे सामान परत करणे समाविष्ट आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande