
कोल्हापूर, 7 डिसेंबर (हिं.स.)। समाजात रस्त्यावर अथवा अन्य कुठेही होणारी छेडछाड, गुंडांकडून होणारा त्रास यांसह कोणत्याही कठीण प्रसंगांना आत्मविश्वासाने तोंड देण्याचा आणि छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवत युवतींनी रणरागिणी बनवण्याचा निर्धार केला. हिंदु जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून ७ डिसेंबर या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात हा निर्धार व्यक्त करण्यात आला. या शिबिरात कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव जिल्ह्यातील एक हजारहून अधिक युवतींनी सहभाग नोंदवला.
या प्रसंगी विविध कठीण प्रसंगांमध्ये युवती-महिलांनी स्वत:चा बचाव कसा करावा, यांविषयीची बचावांच्या सोप्या पद्धतीची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली, तसेच कराटे आणि लाठी-काठी यांचेही प्रशिक्षण देऊन तेही त्यांच्याकडून करवून घेण्यात आले. सव्यसाची गुरुकुलम् मधील प्रशिक्षित वीर आणि वीरांगना यांनी दाखवलेल्या युद्धकालीन प्रात्यक्षिकांमुळे नवचैतन्य निर्माण झाले. सहभागी प्रत्येक युवतीला प्रशिस्तपत्रक देण्यात आले.
या शिबिरात ‘आंतरराष्ट्रीय नेमबाज’ तेजस्विनी सावंत, ‘आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर’ स्नेहांकीता वरुटे, ‘आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन’ सौ. माहेश्वरी सरनोबत, सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, सव्यसाची गुरुकुलम्चे प्रधान आचार्य लखन जाधव, उद्योजक नितीन वाडीकर, कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामधील निर्भया पथकात कार्यरत बाबासाहेब कोळेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
युवतींनी यापुढील काळात त्यांच्यावर होणार्या आघातांसाठी लढायचे आहे, रडायचे नाही याचा ठाम निर्धार करावा. स्वरक्षण हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार असून राष्ट्र प्रथम या संकल्पनेसाठी कार्य करा.’ असे सुनील घनवट यांनी सांगीतले.
लखन जाधव म्हणाले आपल्यातील शक्ती जागृत करून हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले पाहजे. आपल्या हातात जे येईल ते शस्र घेऊन, स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे.’’ नितीन वाडीकर म्हणाले, ‘‘केवळ शरीर सक्षम असून उपयोग नाही, तर मनही सक्षम असणे आवश्यक आहे त्यासाठी या शिबिराची आवश्यकता आहे.’’
सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतांना शारीरिक, मानसिक आणि आत्मबळाच्या स्तरावरही सक्षम व्हायला हवे. त्यासाठी आपल्या कुलदेवतेचा नामजप केला पाहिजे ज्यामुळे आत्मबळ वाढेल. युवतींनी कोणाशीही व्यवहार करतांना सतर्क रहावे. आपला मोबाईल नंबर किंवा हॅण्डसेट अनोळखी व्यक्तींना दिला जाणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच युवतींनी त्यांच्या पर्समध्ये सुरक्षिततेसाठी मिरची पूड, पेपर स्प्रेपण ठेवावा.’’निर्भया पथकाचे पोलीस हवालादार बाबासाहेब कोळेकर म्हणाले, ‘‘आज शिकवलेल्या शिबिरातून जर प्रत्येक युवतीने जर स्वरक्षण केले, तर समाजात घडणार्या अपप्रवृत्तींना निश्चित आळा बसेल ! पोलीस आणि कायदा तुमच्या पाठीशी असून निर्भया पथक २४ तास तुमच्या पाठिशी आहे.
तेजस्वीनी सावंत म्हणाल्या, ‘‘युवतींनो स्वसंरक्षण प्रशिक्षित होऊन स्वत:ला सक्षम बनवा. स्वरक्षण प्रशिक्षाच्या माध्यमातून युवतींचा आत्मविश्वास वाढतो आणि नवी ओळख निर्माण होते. प्रशिक्षित झाल्यास आपल्याला संकटांतून निभावून जाण्याचे बळ मिळते. स्नेहांकिता वरूटे म्हणाल्या, ‘‘युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. समाजाने ‘स्री’चा सन्मान केला पाहिजे. युवतींनो, समाजातील विघातक प्रवृत्तींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण म्हणजे कला नसून तो आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास वाढवणारी व्यवस्था आहे.
या शिबीरासाठी भाजपच्या वंदना बंबलवाड, वैद्या अश्विनी माळकर, पोलीस मित्र अर्चना गुरव, उद्योजक जयंतीलाल पटेल, मंदिर महासंघाचे अशोक गुरव, हिंदू जागरणचे धर्मप्रचारक सनी पेनकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु महासभेचे विकास जाधव आणि प्रशांत पाटील, अमर जाधव, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख गजानन तोडकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव काशीद, मराठा तितुका मेळवावाचे योगेश केरकर, ‘इस्कॉन’चे दीपक खोत उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar