
* सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे - वडेट्टीवार
नागपूर, ७ डिसेंबर (हिं.स.) : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आचारसंहितेदरम्यान विधिमंडळाचे अवघ्या आठवडाभरासाठी हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रथेनुसार विरोधकांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. मात्र, या आमंत्रणाला विरोधकांनी बहिष्कार घालत सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली. याबाबत नागपूरमध्ये विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या अपयशाची अनेक उदाहरणे यावेळी सादर केली.
वडेट्टीवार म्हणाले की, परंपरेनुसार विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण दिले जाते. आम्हाला वैयक्तिक निमंत्रणे मिळाली, मात्र दोन्ही सभागृहांतील घटनात्मक महत्त्वाची असलेली विरोधी पक्षनेते पदे रिक्त आहेत. सत्ताधाऱ्यांचा ही पदे भरण्याचा कोणताही मनसुबा दिसत नाही. संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या आणि मनमानी कारभार करू पाहणाऱ्या सरकारच्या चहापानाला जाणे आम्हाला योग्य वाटत नाही.
वडेट्टीवार यांनी यावेळी इतिहासातील दाखले दिले. ते म्हणाले, १९८० मध्ये जनता दलाचे अवघे १४ आमदार असताना आणि १९८५ मध्ये भाजपचे १६ आमदार असतानाही काँग्रेसने त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले होते. काँग्रेसने सत्ताधारी म्हणून हे घटनात्मक पद कधीही रिक्त ठेवले नाही. मात्र, सध्याच्या सरकारला विरोधकांची भीती वाटते का? की त्यांना कोणाचाही अंकुश नसताना मनमानी कारभार करून राज्याचा गाडा हाकायचा आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील शेतकरी प्रश्नांवरूनही वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यात दररोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. मतांसाठी कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या सरकारने आता 'तारीख पे तारीख'चा खेळ सुरू केला आहे. आता जूनचा मुहूर्त सांगितला जात असला तरी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा काहीही पत्ता नाही, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी