
इगतपुरी, 7 डिसेंबर (हिं.स.)।
- तालुक्यात घोटी-त्र्यंबकेश्वर नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० (अ) च्या भूसंपादनास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे. महामार्गाची मोजणी प्रगतीपथावर असताना, पहिने येथे भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकारी व पोलिस प्रशासनासोबत कृती समितीच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर प्रशासनाने आंदोलकांना ताब्यात घेऊन पुन्हा उपोषणस्थळी सोडले होते. मात्र, सलग तिसऱ्या दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावरील वैतरणा फाट्यावर घोटी-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या मोजणीच्या वेळी पुन्हा भूसंपादन आणि शेतकरी कृती समितीच्या शेतकऱ्यांमध्ये वादविवाद झाले व पुन्हा मोजणी बंद करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात असतानाही कृती समिती विरोधाच्या भूमिकेवर ठाम राहिली.
यावेळी कृती समितीच्या वतीने घोषणाबाजी करत रस्ता मोजणीसाठी तीव्र विरोध दर्शविण्यात आला. 'शेवटपर्यंत विरोधच राहील' अशी ठाम भूमिका कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर व सचिव गोरख वाजे यांनी घेतली आहे. आंदोलनात कृती समिती उपाध्यक्ष सपन परदेशी, विवेक कुटके, अॅड. हनुमान मराडे यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.
घोटी-त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग १६० (अ) बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीने एनएचएआयचे शुभम पुलरवार, सार्वजनिक बांधकाम विभाग व भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी आणि घोटीच्या पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, त्यानंतर मोजणी स्थगित झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV