
जळगाव, , 7 डिसेंबर (हिं.स.) अमळनेरात शाळा व महाविद्यालय बुडवून शहराबाहेरील अंबर्शी टेकडी, गलवाडे रस्ता, साने गुरुजी स्मारक, डुबकी मारोती, मंदिरे आणि इतर निर्जन स्थळी प्रेमचाळे करणाऱ्या तीन प्रेमीयुगुलांवर दामिनी पथकाने धडक कारवाई केली.
काही दिवसांपासून अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी ही मोहिम राबवली. तक्रारदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाला सक्रिय करत मोनिका पाटील, नम्रता जरे, श्यामल पारधी, मिलींद सोनार आणि गजेंद्र पाटील यांना कारवाईचे आदेश देण्यात आले. आदेशानुसार अंबर्शी टेकडीवर झुडुपामध्ये प्रेमचाळे करणाऱ्या तिन्ही जोडप्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामध्ये गलवाडे येथील दोन मुली, धुळे येथील रहिवासी पण अमळनेरात नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहणारी एक मुलगी, तर दोंडाईचा येथील दोघे तरुण आणि गडखांब येथील एक तरुण असा समावेश होता.
सदरील सर्वांनी शाळा–महाविद्यालय बुडवून या ठिकाणी आल्याचे समोर आल्यानंतर पथकाने सहाही जणांना पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी केली. त्यानंतर सर्वांच्या पालकांना बोलावून समुपदेशन करून मुला–मुलींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. कारवाईनंतर अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले असून दामिनी पथकाच्या सतर्कतेचे शहरभर कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर