
रत्नागिरी, 7 डिसेंबर, (हिं. स.) | रत्नागिरी डाकघर अधीक्षक विभागीय कार्यालयातर्फे 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता विभागीय डाक कार्यालयात जिल्हास्तरीय पेंशन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
या अदालदीमध्ये सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादीचा समावेश त्यात असावा. पेन्शन अदालतीमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इत्यादी आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी ज्यांचा 3 महिन्यांच्या आत निपटारा झालेला नाही, अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाईल.
पेन्शनधारकांनी आपला अर्ज ए. डी. सरंगले, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय, रत्नागिरी 415612 यांच्या नावे 15 डिसेंबर 2025 पर्यन्त अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा. त्यानंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतीमध्ये विचार करण्यात येणार नाही, असे कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी