
ठाणे, 7 डिसेंबर, (हिं.स.)। नृत्याचा ठेका...मंत्रमुग्ध करणारे सूर आणि सितार वादातून निघणा-या थेट काळजाला भिडणा-या तानांनी संगीत भूषण पं राम मराठे महोत्सवाचा दुसरा दिवस रसिकांना वेगळाच आनंद देऊन गेला.
ठाणे महानगरपालिका आयोजित संगीत भूषण पं राम मराठे महोत्सव राम गणेश गडकरी रंगायतन येथे साजरा होत आहे. या महोत्सवास ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, पं. मुकुंद मराठे, पं. विवेक सोनार, प्रसिध्द नृत्यांगना मंजिरी देव, मनाली देव, पं. राम मराठे यांचे कुटुंबीय व ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशीचे पहिले पुष्प पद्मश्री पंडित राजेंद्र गंगाणी यांनी गुंफले. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी भगवान गणेश वंदनेने केली. त्यानंतर सादर केलेल्या एक ताल आणि तीन ताल या रचनांनी जयपूर घराण्याची गहनता व गंभीरता प्रभावीपणे प्रकट केली. रंगमंचावर त्यांनी सादर केलेले तीन तालातील थाट नृत्यातून रसिकांसमोर सादर करुन रसिकांना ठेका धरायला लावला. याशिवाय त्यांनी गुरूवंदना अंतर्गत सादर केलेले छोटा भजन आणि तलवारबाजीची विशिष्ट शैलीला रसिकांची टाळयांची दाद मिळाली.
नृत्य सादर करताना रसिक त्यात रमले पाहिजेत, मी जेव्हा नृत्य सादर करतो तेव्हा मी रसिकांना एखाद्या आध्यात्मिक अनुभवांशी जोडण्याचे माध्यम बनण्याचा प्रयत्न करतो. समोर जेव्हा दाद देणारे प्रेक्षक असतात, तेव्हा एक चांगले वातावरण निर्माण होवून नृत्य सादर करायला प्रेरणा मिळते असेही पं. राजेंद्र गांगाणी यांनी नमूद केले. पं. राजेंद्र गंगाणी यांना तबल्यावर फतेहसिंग गंगाणी यांनी, गायन व हार्मोनियमवर श्रीरंग टेंबे, सारंगीवर संदीप मिश्रा तर बासरीवर युवराज सोनार यांनी साथसंगत केली.
दुसऱ्या दिवशीचे दुसरे पुष्प ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांनी गुंफले. तरल स्वरांच्या लयदार ताना, मनाला भुरळ टाकणारे शास्त्रीय राग आणि त्याला मनमुराद दाद देणाऱ्या रसिकांच्या टाळ्या..अशा सूरमयी वातावरणात आरती अंकलीकर यांनी दर्दी रसिकांना मंत्रमुग्ध केले.आरती अंकलीकर यांनी राग पूर्व कल्याण, तीन तालातील बंदिश, एक तालातील तराना तसेच पं. शंकर अभ्यंकर यांची राग पूर्व कल्याणमधील बंदिश सादर केली. आरती अंकलीकर यांना तबल्यावर रोहित देव यांनी तर हार्मोनियमवर सिध्देश बिचोलकर यांनी सांथसंगत केली.
यावेळी आरती अंकलीकर यांनी पं. राम मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला. रामभाऊंची कल्पनाशक्ती विलक्षण होती. मी त्यांचे गाणे ऐकले असून गायन सादर करताना ताल, लय तसेच राग पेश करण्याची त्यांची नजाकत होती. अजूनही कार्यक्रम सादर करायला जाताना कधी मन चलबिचल होतं तेव्हा पं. राम मराठे यांच्या रेकॉर्डिंग्ज ऐकत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
दुसऱ्या दिवशीचे तिसरे पुष्प भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रख्यात सितारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांनी गुंफले. एटावा-इमदादखानी घराण्याच्या सातव्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या उस्ताद शाहीद परवेझ यांनी आपल्या अद्वितीय सितारवादनाने ठाणेकर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमाची सुरूवात त्यांनी राग यमन मधील शांत आणि गंभीर आलापाने केली. त्यानंतर द्रुत गत तानांनी वादनाची ताकद, वेग आणि नजाकत यांचा अप्रतिम संगम त्यांनी सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. सितारवादनाच्या त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे त्यांच्या वादनात सुर, लय, ताल आणि भाव याचा संगम रसिकांना अनुभवायला मिळाला. उस्ताद शाहीद परवेझ यांना तबल्यावर उन्मेष बॅनर्जी यांनी साथसंगत केली.
भाग्यवान विजेते
संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवात प्रत्येक दिवशी भाग्यवान रसिक लकी ड्रॉ च्या माध्यमातून निवडला जातो. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात श्रध्दा हर्डीकर, अशोक सरवटे हे भाग्यवान प्रेक्षक ठरले. त्यांना महापालिकेच्यावतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर