पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
पुणे, 7 डिसेंबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचा अमृत महोत्सव सोहळा दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी भूशास्त्र विभागाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण आणि औत्सुक्यपूर्ण वातावरणात पार पडला. देशभरातील विविध भागांतून आलेले सुमारे
पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न


पुणे, 7 डिसेंबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचा अमृत महोत्सव सोहळा दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी भूशास्त्र विभागाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण आणि औत्सुक्यपूर्ण वातावरणात पार पडला. देशभरातील विविध भागांतून आलेले सुमारे ३५० आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात चहापान व ‘अमृत महोत्सवी वर्ष’ बिल्ला वितरणाने झाली. विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. शिवाजीराव देशमुख, माजी सचिव, सहकार व पणन विभाग, महाराष्ट्र शासन आणि भूगोल विभागाचे १९६५-१९६७ चे विद्यार्थी यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली. सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर हे हजर होते.

भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. अमित धोर्डे यांनी स्वागतपर भाषण करताना विभागात कार्यरत राहिलेल्या सर्व दिवंगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. पुढे विभागाच्या समृद्ध परंपरेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या २० माजी कर्मचाऱ्यांचा सत्कार माननीय कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमृत महोत्सवाचा लोगो, या वर्षात होणाऱ्या परिषदेची पुस्तिका तसेच प्रा. सुधाकर परदेशी यांच्या भूस्खलनावरील पुस्तकाचे प्रकाशन झाले.

कार्यक्रमात आयआयटी मुंबईचे श्री. मोहम्मद कासिम खान, राष्ट्रीय समन्वयक – FOSSEE GIS (MoS) यांनी भूगोल विभागाला मोठा सन्मान जाहीर केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने भूगोल विभागाची ‘ओपन-सोर्स जिओस्पेशियल नॉलेज पार्टनर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भूस्थानिक शिक्षण, संशोधन व जनसंपर्क उपक्रमांच्या समन्वयासाठी विभाग प्रमुख नोडल युनिट म्हणून कार्य करणार आहे. तसेच फोसी GIS प्रकल्पातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे विद्यापीठाला ‘सर्वोत्तम विद्यापीठ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये आनंद व अभिमानाची भावना व्यक्त झाली.

प्रमुख पाहुणे शिवाजीराव देशमुख यांनी भूगोल विभागाच्या ७५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरवपूर्ण आढावा घेत आठवणींना उजाळा दिला. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी विभागाच्या विकासाबद्दल मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. डॉ. गोसावी यांनी विभागासोबतचे अनुभव उलगडले.

दुपारचा सत्र एक वाजता डॉ. सपना ससाणे यांच्या सूत्रसंचालनाखाली सुरू झाला. प्रा. अमित धोर्डे यांनी विभागातील विद्यमान शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ओळख करून दिली. प्रा. रवींद्र जायभाय यांनी डिजिटल माध्यमातून विभागाच्या ७५ वर्षांच्या आठवणी प्रभावी सादरीकरणाद्वारे मांडल्या. प्रा. सुधाकर परदेशी यांनी जिओइन्फॉर्मेटिक्स शाखेची प्रगती आणि विभागातील साधनसंपत्तीची माहिती दिली.

यावेळी दिवंगत प्रा. के. आर. दीक्षित यांचा व्हिडिओ संदेश प्रदर्शित करण्यात आला. विविध बॅचेसच्या आठवणींचे दृकश्राव्य सादरीकरणही सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. यानंतर विभागाची ‘अलुम्नी असोसिएशन’ स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले. निवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विभागातील आठवणी जागवल्या.

भूगोल विभागाचा अमृत महोत्सवी सोहळा हा विभागाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा भव्य साक्षीदार ठरल्याची भावना सर्वांच्या मनात होती. उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande