
कोल्हापूर, 7 डिसेंबर (हिं.स.)।
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ‘स्मॅक’ अंतर्गत स्मॅक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल, कोल्हापूर [ एसईपीसी ] तर्फे ‘इंडो-जपानी बिझनेस डायलॉग’ ही आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषद निसर्ग रिसॉर्ट, सादळे-मादळे येथे उत्साहात व यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. भारत-जपान व्यावसायिक सहकार्य, निर्यात व गुंतवणूक संधी, तसेच जागतिक बाजारपेठेतील ट्रेंड्स यावर या परिषदेत विचारमंथन झाले. परिषदेचे अध्यक्षस्थान स्मॅक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे चेअरमन आय. ए. पाटील यांनी भूषविले.
जपानी शिष्टमंडळामध्ये आययू जोहोकेई इनोव्हेशन सेन्मोन्शोकू विद्यापीठाचे प्रा. कुनीओ हार, लुट्झ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सायाका मियुरा, इसिरीस इन्फिनिटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी युको कोंडो चिहाया, अकासाका, वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अकीहिसा मुकाई, प्रॅक्टिस, परफॉर्मिंग आर्टिस्ट व लीडरशिप स्ट्रॅटेजी आर्किटेक्टचे प्रा. मयुमी ओगाटा, डायनाव्हिजन कंपनीच्या संस्थापिका केको अनागुची, अस-इस कंपनी लि., च्या प्रतिनिधी संचालक चिहिरो निनागावा, समन्वयक मयुमी कोइके यांची प्रमुख उपस्थिती होती. .
यावेळी आय. ए. पाटील म्हणाले की, भारत-जपान यांच्यातील विश्वास, सन्मान व सहकार्याच्या नात्यास नव्या उंचीवर नेण्यासाठी औद्योगिक भागीदारी हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. जपानी उद्योगांची अचूकता, शिस्त, गुणवत्ता व नवोन्मेष ही भारतीय लघुउद्योग क्षेत्रासाठी प्रेरणादायी मानदंड आहेत. संयुक्त उद्योग, तंत्रज्ञान हस्तांतरण, सप्लाय-चेन विकास व निर्यातवृद्धीच्या व्यापक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी जपानी भाषेत “दोमो अरिगातो” म्हणत आभार व्यक्त केले, त्यावर संपूर्ण शिष्टमंडळाने टाळ्यांच्या गजरात “वी लव्ह इंडिया ” असा नारा दिला.
शिष्टमंडळ प्रमुख प्रा. कुनीओ हार म्हणाले, “आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक करा, त्यांचा सन्मान करा आणि स्वतःवरही अभिमान बाळगा” हा कार्यसंस्कृतीचा मूलमंत्र उद्योगांना प्रगतीकडे नेतो. सायाका मियुरा यांनी फन फॅन चॅट ही साधी पण प्रभावी संवादपद्धती असून शिक्षण, अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेतील विकासास गती देते,” असे सांगत सर्वांना प्रेरित केले. प्रतिनिधींनी पुढे नीती व प्रशासन, सामाजिक उद्योजकता, लघुउद्योग , डिजिटल हेल्थ, कौशल्य व उपजीविका, महिला सक्षमीकरण, समावेशन आणि शाश्वतता या विषयांवर मार्गदर्शन केले.
या परिषदेमुळे कोल्हापूर व परिसरातील उद्योगांसाठी जपानी बाजारपेठेचे दरवाजे खुलण्यास मदत होणार असून पुढील काळात स्मॅक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल सोबत सामंजस्य करार होणार असल्याची माहिती मान्यवरांनी दिली. विविध प्रेझेंटेशन्स व नेटवर्किंग उपक्रमांमुळे दोन्ही देशांच्या उद्योगांमध्ये थेट कनेक्टिव्हिटी निर्माण झाली.
परिषदेस स्मॅक चेअरमन जयदीप चौगले, आयआयएफ चेअरमन राहुल पाटील, व्हाईस चेअरमन सतीश कडुकर, इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन चे व्हाईस चेअरमन महेश दाते, उद्योजक चे जयूभाई पारेख, रवींद्र नाकील, मल्हार भांदुर्गे, सुनील बत्तासे, समीर पारीख, शैलेश पटेल, शैलेश शिंदे, सागर मुळीक, मंगेश हराळे, आदित्य हराळे, गजानन गोंगाने, योगेश गोंगाने, अमोघ कामत, शुभम पाटील, राजश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी वारणा विद्यापीठ, वारणानगर व गौरव घेवडे यांचे सहकार्य लाभले.
--------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar