
नवी दिल्ली, 7 डिसेंबर (हिं.स.)भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने पलाश मुच्छलसोबत लग्नाबाबच मौन सोडले आहे. मानधनाने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून याला दुजोरा दिला. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लग्न मोडले असल्.याचे म्हटले आहे. मानधन आणि पलाशचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी होणार होते. पण लग्नादरम्यान मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याचे उघड झाले. ज्यामुळे लग्न रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता १५ दिवसांनंतर, ७ डिसेंबर रोजी मानधनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि लग्न मोडल्याची कबुली दिली.
मानधनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल खूप चर्चा होत्या. मला वाटते की, सध्या माझ्यासाठी बोलणे महत्त्वाचे आहे. मी खूप खाजगी व्यक्ती आहे आणि मी ते असेच ठेवू इच्छिते. पण मी हे स्पष्ट करू इच्छिते की, लग्न रद्द करण्यात आले आहे. भारतीय महिला संघाची उपकर्णधार मानधनाने लिहिले, मी हे प्रकरण इथेच थांबवू इच्छिते आणि तुम्हा सर्वांनाही असेच करण्याचे आवाहन करते. मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही सध्या दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या गतीने पुढे जाण्याची परवानगी द्या. मला वाटते की, आपल्या सर्वांच्या मागे एक मोठा उद्देश आहे आणि माझ्यासाठी, तो नेहमीच सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा आहे. मला आशा आहे की, मी जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन आणि ते नेहमीच माझे लक्ष राहील. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.मानधनाने सांगितले की, तिचे आता एकमेव लक्ष तिच्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि क्रिकेट खेळणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे