
सोलापूर, 7 डिसेंबर (हिं.स.)। माढा तालुक्यातील लऊळ, उजनी (मा )., पडसाळी व भुताष्टे या चार गावासाठी भेडसावणारा विजेचा प्रश्न आता संपुष्टात आला असून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी व योजनेच्या ऊर्जा प्रकल्प अंतर्गत विद्युत सब स्टेशन उभारणीस लऊळ येथे अधिकृत जागा उपलब्ध झालेली असून याबाबतीचा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाला आहे त्यामुळे आगामी थोड्याच कालावधीत या ठिकाणी विद्युत सबस्टेशन प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे.
लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते लऊळ येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन-उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे यांनी दिली आहे.रणजितसिंह शिंदे म्हणाले, माढा तालुक्यातील लऊळ, पडसाळी, भुताष्टे व उजनी (मा.) या गावांना सीना माढा सिंचन योजनेचे मुबलक पाणी उपलब्ध असून देखील कमी दाबाचा, मोजक्याच वेळेत व खंडित वीज पुरवठा होत असल्यामुळे हजारो एकरातील बागायती पिके पाण्याअभावी जळून जात होती व त्यामुळे या संपूर्ण परिसरातील शेकडो शेतकरी नाराज होत होते. विशेष असे की लऊळ हद्दीतील मोठी जागा अनेक वर्षांपासून महाझिन्को कंपनीकडे प्रकल्प उभारणीस देण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड