गुन्हे तपासाला वेग : पेणमध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची एंट्री
रायगड, 7 डिसेंबर (हिं.स.)। पेण उपविभागीय पोलीस कार्यालयात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाल्याने गुन्हे अन्वेषणाच्या कामाला मोठी चालना मिळाली आहे. या व्हॅनमुळे आता पेण, खालापूर आणि कर्जत परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास अधिक जलद, अचूक आणि
गुन्हे तपासाला वेग : पेणमध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची एंट्री


रायगड, 7 डिसेंबर (हिं.स.)। पेण उपविभागीय पोलीस कार्यालयात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाल्याने गुन्हे अन्वेषणाच्या कामाला मोठी चालना मिळाली आहे. या व्हॅनमुळे आता पेण, खालापूर आणि कर्जत परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास अधिक जलद, अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीने करता येणार आहे.

आजवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी नमुने गोळा करून ते दूर अंतरावरील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवावे लागत होते. त्यामुळे तपास प्रक्रियेला विलंब होत असे. मात्र आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाल्याने घटनास्थळीच प्राथमिक तपास, डिजिटल पुराव्यांचे संकलन व विश्लेषण शक्य होणार आहे. मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, सीसीटीव्ही फुटेज यासारख्या डिजिटल पुराव्यांची तात्काळ तपासणी या व्हॅनमध्ये करता येणार आहे.

या सुविधेमुळे सायबर गुन्हे, फसवणूक, महिलांविरोधातील गुन्हे, चोऱ्या तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित तपास पथकाची नेमणूकही करण्यात आली असून हे पथक पेण, खालापूर व कर्जत परिसरात कार्यरत राहणार आहे.

या संदर्भात पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी माहिती देताना सांगितले की, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्ह्यांच्या तपासाची गती निश्चितच वाढणार असून दोषींना त्वरित पकडणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच निरपराध व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठीही या आधुनिक सुविधांचा मोठा फायदा होणार आहे.

या नव्या फॉरेन्सिक सुविधेमुळे रायगड जिल्ह्यातील पोलिसिंग अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानी होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande