
जळगाव , 7 डिसेंबर (हिं.स.) मास्टर कॉलनीत घराच्या गॅलरीतील सांडपाण्याचा चोक झालेला पाइप मोकळा करण्यासाठी मौलाना साबीर खान नवाझ खान (वय ४३) यांनी लोखंडी सळई वापरली. मात्र, ही सळई थेट ११ केव्ही क्षमतेच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श होताच तीव्र प्रवाहाचा जबर धक्का बसून मौलाना आणि त्यांची मुलगी आलियाबी (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत गंभीर भाजलेल्या मौलानांची भाची फातेमा अजिम पठाण (वय १०, रा. अजिंठा) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान घटनेच्या २६ तासांनी तिचाही मृत्यू झाला. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी या परिसरात वीजवाहिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी दाखल झाले होते. परंतु तिसऱ्या जखमी मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच संतप्त नागरिकांनी सर्व कर्मचाऱ्यांना परिसरातून परत पाठवले. स्थानिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून वीजवाहिन्यांची धोकादायक रचना वेळेवर दुरुस्त न झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, महावितरणने तातडीची मदत म्हणून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश दिल्याचे सांगितले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर