
सोलापूर, 7 डिसेंबर (हिं.स.)। मळोली (ता. माळशिरस) येथे सद्यस्थितीत एस. टी. कर्मचारी व प्रवाशी यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत खटके उडत आहेत. हे प्रवास करताना दिसून येते. यामध्ये जास्त प्रमाणात महिला व ज्येष्ठ नागरिक यांचे प्रमाण अधिक आढळून येते. शासनाने घेतलेले निर्णय एसटी महामंडळाच्या कर्मचारी यांच्या कंठाशी आलेले दिसून येत आहेत.चालक व वाहक हे लाडक्या बहिणींना दिलेले अर्धे तिकीट फाडताना वाहकांना आपल्या खिशातील पैसे जात असल्याचा भास होत आहे. दात-ओठ खात गाडीत बसण्याच्या अगोदर हे प्रवाशांना सुट्टे पैसे आहेत का?, गाडी याठिकाणी थांबणार नाही?, जागा शिल्लक नाही? अशी उत्तरे देऊन प्रवाशांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. लांब पल्ल्याच्या गाडीचे चालक व वाहक उड्डाणपूल, गर्दीची ठिकाणी टाळून बस थेट दामटवून पुढे घेऊन जाण्याचा प्रकार सर्रास वाढत आहे.रात्री मुक्कामावरून आलेली गाडी स्वच्छ न करता ताब्यात घेणे ही जबाबदारी विसरून हे कर्मचारी स्वतःच तंबाखू खाऊन एसटी लाल पिचकाऱ्या मारून खराब करण्याच्या मार्गावर आहेत. नक्की कोणाचा दोष म्हणून हे सर्व सहन करण्याची सर्वसामान्य नागरिकांना वेळ येत आहे. अनेकजण एसटीमध्ये वाद होतात म्हणून खासगी वाहनाने जास्त प्रवास करू लागले आहेत. यासाठी कर्मचारी यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी त्यांना योग्य समुपदेशन करण्याची वेळ आता एसटी महामंडळ यांच्यावर येऊन ठेपली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड