
मुंबई, 7 डिसेंबर, (हिं.स.)। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या पुढाकाराने दादर येथील टिळक भवनमध्ये एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. निवडणूक व्यवस्थापन, महापालिका प्रशासन आणि माहिती अधिकार (RTI) या महत्त्वाच्या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका व आरटीआयसंदर्भात सविस्तर माहिती दिली. “माहिती कशी मिळवायची आणि जनहितासाठी तिचा प्रभावी वापर कसा करायचा” याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच “बूथ मजबूत करा, मग बाकीचे सर्व होऊ शकते,” असा ठाम संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया, आवश्यक अटी आणि काळजीपूर्वक पाळावयाच्या बाबींची माहिती दिली.
माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी मुंबई महानगरपालिकेची रचना, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि कामकाजाची पद्धत यावर विस्तृत प्रकाश टाकला. “कोणत्या विभागाचे कोणते काम आहे आणि नागरिकांच्या सेवेत जनप्रतिनिधींनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात” याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
भारतीय युवक काँग्रेसचे सोशल मीडिया चेअरमन मनु जैन यांनी महापालिका निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत प्रशिक्षण दिले. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रचार, संवाद आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या विविध रणनीती बाबत मार्गदर्शन केले.
या शिबिरात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरभी द्विवेदी, सचिव प्रभारी पवन मजेठिया, सचिव हरगुन सिंह यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई युवक काँग्रेसतर्फे आयोजित हे प्रशिक्षण शिबीर नव्या कार्यकर्त्यांसाठी ज्ञानवर्धक ठरले. आगामी निवडणुकीत प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक दिशा, माहिती आणि आत्मविश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया सहभागी झालेल्या पदाधिका-यांकडून व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर