
सोलापूर, 7 डिसेंबर (हिं.स.)।सोलापूरच्या दोन देशमुख आमदारांमध्ये कायमच “तू भारी की मी भारी” यावरून कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळायचे. निवडणुका आल्या किंवा वरिष्ठ नेते आले तर तेवढेच वरून वरून ते एकत्र दिसायचे परंतु नंतर एकमेका विरोधात कुरघोड्या असायच्या. पण आता हेच देशमुख आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीपासून एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर सोलापुरातील आणि विशेष करून भारतीय जनता पार्टी मधील राजकीय समीकरणे प्रचंड बदलली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे झाले. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यातच शहर मध्य मधून भाजपचे आमदार म्हणून देवेंद्र कोठे निवडून आले आणि त्यानंतर अचानक नरेंद्र काळे यांचे शहराध्यक्ष पद काढून रोहिणी तडवळकर यांच्याकडे देण्यात आले.
बाजार समितीच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी विजय देशमुख यांच्याशी हात मिळवणी करत पॅनल उभे केले, तेव्हापासून हे दोन्ही नेते कायम एकत्र दिसत आहेत. एकमेकांच्या घरी जाणे, कार्यालयात जाणे, कार्यक्रमाला जाणे चालू आहे.
मनीष देशमुख यांच्या वाढदिवसाला विजयकुमार देशमुख यांनी स्वतः त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विजयकुमार देशमुख यांचे बरेच कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात गेले, असे पहिल्यांदाच घडले असेल नंतर सुभाष देशमुख यांनी दिवाळीचा फराळ कार्यक्रम आयोजित केला. तेव्हाही विजय देशमुख यांचे सर्व समर्थक कार्यकर्त्यांनी फराळाला आवर्जून उपस्थिती लावली तसेच सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल सामूहिक विवाह सोहळ्याला सुद्धा विजय देशमुख समर्थक कार्यकर्त्यांचा पुढाकार दिसून आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड