
रायगड, 8 डिसेंबर (हिं.स.)। अक्षरमंच सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने “अखंड वाचनयज्ञ” हा उपक्रम हाशिवरे येथील हाशिवरे हितवर्धक मंडळ संचलित महात्मा गांधी विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे व वाचन संस्कृतीचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे राबविला जात आहे. दरवर्षी सुमारे १५०० हून अधिक वाचक या उपक्रमात सहभागी होत असतात. यावर्षी प्रथमच महात्मा गांधी विद्यालयातील पाचवी ते बारावी इयत्तेतील १०१ हून अधिक विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येऊन कथा, कविता व लेखांचे अभिवाचन केले. या उपक्रमाचे आयोजन हाशिवरे हितवर्धक मंडळाचे सचिव अनिल मोकल यांच्या प्रयत्नातून करण्यात आले.
कार्यक्रमास सल्लागार सुबोध मोकल, कार्यकारिणी सदस्य निशिकांत मोकल, कवी दिलीप मोकल व मिलिंद मोकल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ. योगेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी. डी. गायकवाड, पर्यवेक्षक एन. डी. प्रबळकर आणि शिक्षक बी. जी. शिकारे यांनी नियोजन व सूत्रसंचालन केले.कार्यक्रमात कवी दिलीप मोकल यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व विशद करून आपल्या भावना कवितेतून व्यक्त करण्याचा सल्ला दिला तसेच कुसुमाग्रज यांची एक सुंदर कविता सादर केली. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना “आत्मविश्वास यशाचा पाया” (लेखक – संकेत खर्डीकर) हे पुस्तक व सहभाग प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सदर उपक्रमासाठी विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था सचिव हेमंत नेहते यांनी माहिती दिली, तर अध्यक्ष सुबोध मोकल यांनी मार्गदर्शन केले व प्रिया दोरवे यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके