
डोंबिवली, 8 डिसेंबर (हिं.स.)।
वाढत्या शहरीकरणाचा फटका मुंबई जवळ असणाऱ्या सांस्कृतिक व शैक्षणिक डोंबिवली शहराला बसला आहे. शहराचा नैसर्गिकपणा हरवून गेला आहे. पूर्वी मुंबई जवळ असणारे हवेशीर शांत डोंबिवली गांव म्हणून लोकांची ओढ होती. त्यामुळे मुंबईतील लाखो कुटुंबीय डोंबिवलीत स्थायिक झाली. त्यामध्ये साहित्यिक व नाट्यक्षेत्रासह उच्चपदस्त सरकारी नोकरदारांची संख्या मोठी होती. परंतु त्याच डोंबिवलीचं स्वरूप पालटले असून आता नव्या शहरीकरणाचा मुलामा चढला आहे. आता शहरातील रस्त्यावर कुठेही चिखल माती पायाला लागणार नसून मुख्य रस्त्यासह पायवाटही काँक्रीटीकरणतून होत आहेत. परिणामी थंड वाटणारे शहर आता कडक उन्हाच्या रखरखाटात तापताना दिसून येत आहे.
रहाण्याजोगी आणि कमी किंमतीत घरांचा प्रश्न सुटू शकतो या कारणाने डोंबिवलीत लोकसंख्या हळूहळू वाढू लागली. परिणामी रिकाम्या जागी घर बांधणी व्यवसाय जोर धरू लागला. त्यानंतर जिथे मोकळी जागा दिसेल तिथेही घराणी निर्मिती झाली. आणि त्याचा पुढे एवढा उद्रेक झाला की खाडीकिनाराही घरांनी वेढला गेला. त्यामुळे पुढे पुढे पायाभूत सुविधांची गरज मोठ्या प्रमाणास वाढीच लागली. शाळा, कॉलेज, बागबगीचा, मनोरंजनासाठी ठिकाणे, मैदाने यांची आवश्यकता जाणवू लादली. यातूनच काँक्रीटीकरण फोफावत गेले. छोट्या इमारतींच्या जागी टॉवर उभे राहू लागले. हे सर्व होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे दुर्लक्षित होऊ लागले. आम्हाला चांगले रस्ते द्या या मागणीचा जोर वाढीस लागला आणि त्यामुळेच पुढे काँक्रीटीकरण रस्त्याने संपर्ण डोंबिवली शहर सामावून गेले.
आता डोंबिवली शहरात आता पूर्वीचा मातीचा किंवा डांबरी रस्ता क्वचितच दिसून येईल. मुख्य हमरस्त्यांचे चौपदरीकरण झाले असून ते सर्व काँक्रीटीकरण माध्यमातून झालेले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा करून रस्त्यांचा विषय मार्गी लावला आहे. आता डोंबिवली शहराचा विचार केला तर ऐंशी टक्के रस्ते काँक्रीटीकरण माध्यमातून होत आहेत. विशेष म्हणजे शहरांतर्गत असलेले छोटे रस्ते व पायवाटही काँक्रीटच्याच होत आहेत. मागील वर्षभरापासून कोणताही एक शनिवार वा रविवार असा गेला नाही की काँक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन झाले नाही. त्यामुळे आता पावसाळ्यात चिखल किंवा उन्हाळ्यात माती पायाला लागेल हा प्रश्नच राहिला नाही. सर्वत्र सिमेंट काँक्रीटीकरण माध्यमातून कामे होत आहेत. खाडीकिनारी असणारी जंगल संपती आता कमी होत चालली आहे. परिणामी गावाचा नैसर्गिकपणा नाहीसा झाला आहे. पूर्वी दिसणारी हिरवळ आता कृत्रिमरीत्या तयार करावी लागणार आहे. रस्त्यावरील जुनी झाडे नाहीशी झाल्याने रस्त्यांवरची सावली हरपली आहे. परिणामी पूर्वीच्या गावची नैसर्गीक संपत्ती नष्ट झाल्याने भविष्यात डोंबिवलीतील रस्त्यांवर चिखल - माती दिसणार नाही कारण नव्या शहरीकरणाचा उदय झाला आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi