
जळगाव, 8 डिसेंबर (हिं.स.) जळगाव तालुक्यात नव्या एमआयडीसी उभारणीसाठी जमीन मोजणीला शेतकरी बांधवांनी सकारात्मक संमती दर्शवली आहे. “विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्काचा तडजोड होऊ देणार नाही. जमिनीच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याला योग्य, समाधानकारक आणि कायदेशीर भरपाई मिळाल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया पुढे जाणार नाही, असा ठाम विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.
जळगाव तालुक्यातील मौजे पिंपळे, चिंचोली आणि कुसुंबे या गावांत नवीन औद्योगिक वसाहत उभारणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री व जिल्हा महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.पालकमंत्री पाटील म्हणाले की,
जळगावच्या औद्योगिक विकासाबरोबरच शेतमालाला नवे बाजार, तरुणांना रोजगार आणि परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास हा शासनाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य देतच पुढील निर्णय घेण्यात येतील. तुमच्या हक्काचा प्रत्येक पैसा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आश्वासक, सकारात्मक आणि ठाम भूमिकेमुळे शेतकरी बांधवांनी मोजणीस तत्पर सहकार्याची ग्वाही दिली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हिताला जिल्हा प्रशासनाचे नेहमीचं प्राधान्य आहे. शेत व जागेची मोजणी झाल्यानंतर दर मंजुरीची पुढील कार्यवाही करण्यात येईल. नव्या औद्योगिक वसाहतीमुळे जळगाव जिल्ह्यात रोजगार, गुंतवणूक आणि आर्थिक मूल्यवर्धनासाठी नवे मार्ग खुले होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर