
पुणे, 08 डिसेंबर (हिं.स.) : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, शेतकरी–कामगारांचे नेते आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे आज रात्री 8.25 वाजता पुण्यात निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.
बाबा आढाव यांची प्रकृती ढासळत असल्याची माहिती मिळताच अनेक नेत्यांनी रुग्णालयात भेट दिली. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली होती. नुकतेच ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर पवारांनी त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांचे कार्य स्मरणात आणले होते.बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्राने कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभर लढणारा समाजवादी नेता गमावल्याची भावना राज्यभर व्यक्त होत आहे.
सामाजिक आंदोलनांचे प्रणेते
बाबा आढाव 1970 च्या दशकात पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. त्या काळात ते समाजवादी पक्षाचे सक्रिय सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती.समाजातील तफावत दूर करण्यासाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ ही महत्त्वपूर्ण मोहीम राबवली. जात-पात भेदभावाविरोधातील या उपक्रमाने राज्यातील सामाजिक चळवळींना नवी दिशा दिली.
राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य
अत्यंत निर्भीड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे बाबा आढाव यांनी वयाच्या 93 व्या वर्षीही आंदोलनात सहभाग घेतला होता. शिवसेना–राष्ट्रवादीतील फुटीपासून देशातील राजकीय घडामोडींवर त्यांनी रोखठोक भूमिका घेतली होती.ते म्हणाले होते “माणूस सकाळी कुठं असेल आणि संध्याकाळी कुठं असेल सांगता येत नाही; कारण सत्तेची भूक वाढली आहे. पण लक्षात ठेवा, 140 कोटी जनतेच ठरवणार आहे कोणाचं काय.”
कॅनडातील नातेवाईकदेखील भारतातील परिस्थितीविषयी प्रश्न विचारत असल्याचे त्यांनी सांगत, “काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा”, असे आवर्जून म्हटले होते.
राज्याचा लढवय्या समाजवादी आंदोलनकर्ता हरपला
सामाजिक न्याय, कामगार हक्क आणि ग्रामीण उत्थानासाठी आयुष्य वेचणारे बाबा आढाव यांचे निधन म्हणजे एक युग समाप्त झाल्याची भावना सामाजिक वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यांच्या दीर्घ कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या समाजवादी आंदोलनाला दृढ पाया मिळाला होता.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी