बांगलादेशने कांदा आयातीचे दरवाजे उघडले; कांदा दर सुधारण्याची शक्यता
लासलगाव, 8 डिसेंबर (हिं.स.)। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेजारील देश बांगलादेशने अखेर भारतातून कांदा आयातीस परवानगी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार दोघांनाही मोठा आर्थिक आधार मिळण्याची चिन्हे आहेत. या
कांदा


लासलगाव, 8 डिसेंबर (हिं.स.)।

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेजारील देश बांगलादेशने अखेर भारतातून कांदा आयातीस परवानगी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार दोघांनाही मोठा आर्थिक आधार मिळण्याची चिन्हे आहेत.

या निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश दररोज ३० टन क्षमतेचे ५० आयात परवाने जारी करणार आहे. हे परवाने केवळ ज्या आयातदारांनी अर्ज केले होते, त्यांनाच देण्यात येतील. यामुळे एका दिवसात भारतातून बांगलादेशमध्ये सुमारे १५ हजार क्विंटल कांदा निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, निर्यात सुरू झाल्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होण्यास निश्चितच चालना मिळेल आणि नुकसानीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. दिघोळे यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, भविष्यात कोणत्याही परिस्थितीत कांदा निर्यातीवर बंदी घालू नये. तसेच, इतर देशांनीही अशीच आयात सुरू केल्यास देशातील कांद्याचे दर अधिक स्थिरावतील आणि वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अवकाळी पाऊस आणि पूरस्थितीमुळे या हंगामात उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीनंतर दरात काहीशी वाढ झाली असली तरी, सध्या बाजारात पुन्हा मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दरातील घसरणीविरोधात आंदोलनेही केली होती. अशा परिस्थितीत, बांगलादेशने घेतलेला हा आयात निर्णय भारतीय कांदा उत्पादकांसाठी अत्यंत आशादायक ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande