
आतापर्यंत १८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)।
बीड जिल्हा परिषदेतील अनेक प्रकरण उजेडात येत आहेत. येथील सुमारे ४०० कर्मचाऱ्यांच्या दिव्यंगत्वाची आता थेट रुग्णालयांमध्ये फेर तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे बनावट दिव्यांग किंवा कमी दिव्यांग असताना अधिक प्रमाणाचे प्रमाणपत्र मिळवलेल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. अद्याप याचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी लवकरच ही तपासणी होणार असल्याची शक्यता आहे
राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तपासणी करण्यात आली. मात्र या तपासणीत केवळ दिव्यांग कर्मचाऱ्यांकडे यूडीआयडीआय आहे का व ते खरे आहे का याचीच तपासणी केली गेली होती. त्यांचे दिव्यांगत्व, दिव्यांगत्वाचे प्रमाण याची तपासणी करण्यात आली नव्हती.
बीड जिल्हा परिषदेने सुमारे ४०० कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली यातही १८ कर्मचाऱ्यांनी यूडीआयडीआय कार्ड
सादर केले नव्हते. त्यांना कार्ड सादर करण्यासाठी मुदत दिली गेली होती. मात्र तरी त्यांनी कार्ड सादर न केल्याने सीईओंनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, आता सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची रुग्णालयामार्फत दिव्यांगत्व पडताळणी करण्यात येणार आहे.
अनेक कर्मचारी धडधाकट दिसत असताना त्यांनी कर्णबधीर असल्याचे प्रमाणपत्र दिलेले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची तपासणी ही शासनाच्या राष्ट्रीय भाषण व श्रवण संस्थेत (एनआयएसएच) करण्यात येणार आहे. अशी माहिती मिळाली आहे
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis