शोकप्रस्ताव, पुरवणी मागण्या मांडून दोन्ही सभागृह दिवसभरासाठी स्थगित
- शेतकरी समस्या, विरोधी पक्षनेता निवडीवरून विरोधक आक्रमक नागपूर, 8 डिसेंबर (हिं.स.) - उपराजधानीत आजपासून (८ डिसेंबर) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच दोन्ही सभागृहांत शोकप्रस्ताव मांडल्यानंतर कामकाज दिवसभरा
नागपूर विधानभवन


- शेतकरी समस्या, विरोधी पक्षनेता निवडीवरून विरोधक आक्रमक

नागपूर, 8 डिसेंबर (हिं.स.) - उपराजधानीत आजपासून (८ डिसेंबर) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच दोन्ही सभागृहांत शोकप्रस्ताव मांडल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, विधानसभेत एकूण ७५,२८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. आता पुढील दिवसांमध्ये या मागण्यांवर चर्चा व मतदान होणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेत्याच्या रिक्त पदावरून सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सरकारवर मनमानी कारभाराचा आरोप केला. आम्ही नाव दिलंय, तर तुम्हाला विरोधी पक्षनेता नेमायला काय दुखणं आहे? संविधानिक पद रिक्त ठेवून कारभार करत आहेत. हा मनमानी कारभार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवरुन विरोधी पक्ष विधिमंडळाच्या आवारात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवन परिसरात आंदोलन करण्यात आले. नेत्यांनी गळ्यात संत्री, वांगी याची माळ घालून आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर, शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चार सो बीस, विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकरी झाला कंगाल, अशा घोषणा विरोधकांनी केल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande