

ठाणे, 8 डिसेंबर (हिं.स.)। “बालविवाहाची प्रथा हद्दपार करायची असेल, तर समाजातील प्रत्येक घटकाने प्रशासनास सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. अशा घटना दिसताच 1098 या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी,” असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सामाजीक विकास ट्रस्ट (एमएसव्हीटी/सेवा) यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरावर जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
चित्ररथ मोहिमेला हिरवा झेंडा दाखवत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, “बालविवाह रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. परिसरात कुठेही बालविवाहासंबंधित संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधून माहिती द्यावी. पुढील सर्व कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल.”तसेच महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सामाजीक विकास ट्रस्ट/सेवा आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने आणि दोन पावले पुढे जाऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बालविवाह निर्मूलन मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी “सर्वांनी आता ठरवूया... बालविवाह हरवूया!” अशी घोषणा देत बालविवाहविरोधी लढ्यासाठी सामुहिक शपथ घेत दृढ संकल्प व्यक्त केला. तसेच स्वाक्षरी अभियानातील फलकावर स्वाक्षऱ्या करून बालविवाह मुक्त भारत अभियानातील सहभाग नोंदवला.
यावेळी ठाण्याचे न्यायमूर्ती रविंद्र पाजणकर, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे रामकृष्ण रेड्डी, पल्लवी जाधव, संरक्षण अधिकारी रेखा हिरे यांच्यासह सखी केंद्र केंद्र, विशेष बाल विकास पोलिस अधिकारी, चाईल्ड लाईन ठाणे, एमएसव्हीटी/सेवा संस्थेचे संस्थापक अशोक पवार, रामेश्वर भाले, वैभव गायकवाड प्र. माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे, पोलीस प्रशासनातील अधिकारी तसेच पहिली ते चौथी इयत्तेतील विद्यार्थीनी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule