
रत्नागिरी, 8 डिसेंबर, (हिं. स.) : शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागांतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत सुरू असलेल्या दिव्यांग सप्ताहाची सांगता मंगळवारी, दि. ९ डिसेंबर रोजी होणार आहे.
रत्नागिरीत मराठा मंदिर सभागृहात सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होईल. ‘सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविणे’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. जास्तीत जास्त दिव्यांगांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनीता शिरभाते यांनी केले आहे.
या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा, दिव्यांगत्व जन्माला येऊ नये याबाबत डॉ. स्वाती पाटील, चॅट बॉट विषयावर अभिजित भट (आय .टी. सेल, जिल्हा परिषद, रत्नागिरी), शासकीय योजनांबाबत दीपक आंबवले, वित्तीय महामंडळाच्या जिल्हा समन्वयक रोशनी सावंत, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र योजनांबाबत संकेत चाळके (स्पीच थेरपिस्ट) मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर विशेष प्रावीण्यप्राप्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाईल.
कार्यक्रमात कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यामंदिर, सविता कामत विद्यामंदिर, शामराव भिडे कार्यशाळा या शाळेचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी