डोळ्यांना चष्मा लागतो पण दृष्टीला चष्मा लागत नाही - अशोक बागवे
अक्षरमंच प्रतिष्ठानचा अखंड वाचनयज्ञ उपक्रमाला उदंड प्रतिसाद डोंबिवली, 8 डिसेंबर (हिं.स.)। डोळ्यांना चष्मा लागतो पण दृष्टीला कधी चष्मा लागत नाही. सजग डोळ्यांनी आपण आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे पाहिले पाहिजे आणि ही दृष्टी वाचनामुळे आपल्याला मिळते
डोळ्यांना चष्मा लागतो पण दृष्टीला चष्मा लागत नाही --- अशोक बागवे


अक्षरमंच प्रतिष्ठानचा अखंड वाचनयज्ञ उपक्रमाला उदंड प्रतिसाद

डोंबिवली, 8 डिसेंबर (हिं.स.)। डोळ्यांना चष्मा लागतो पण दृष्टीला कधी चष्मा लागत नाही. सजग डोळ्यांनी आपण आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे पाहिले पाहिजे आणि ही दृष्टी वाचनामुळे आपल्याला मिळते. मराठी भाषेचे भविष्य धूसर नाही, हे आज अखंड वाचन यज्ञ सारख्या उपक्रमांमुळे सिद्ध झाले आहे. आजच्या कार्यक्रमात मला सरस्वती प्रत्यक्ष अवतरलेली दिसली. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे यांनी केले. अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आयोजित सलग ३६ तास चाललेल्या अखंड वाचन यज्ञाचे समारोप प्रसंगी ते बोलत होते.

वाचन आपल्या जाणिवा समृद्ध करते. इतर माध्यमांपेक्षा वाचनामध्ये अनेक गोष्टींचे वेगळेपण आढळते. स्मरणशक्ती व निरीक्षणशक्ती वाचनामुळे वाढीला लागते तसेच वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढीला लागून आपल्या भाषेचे सौंदर्य वाढते. तसेच वाचनामुळे सुसूत्रपणे विचार करण्याची शक्ती वाढीस लागते. असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध लेखिका सारिका कुलकर्णी यांनी केले. वाचन करू नये किंवा वाचनाचा उपयोग नाही असे मानणाऱ्या लोकांवर त्यांनी आपल्या नर्म विनोदी शैलीत टीका करून वाचनाचे महत्व विविध उदाहरणाचे माध्यमातून विषद केले. तसेच योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून हा उपक्रम सातत्याने सुरु राहिला पाहिजे असे मतही या प्रसंगी मांडले.

या प्रसंगी जागतिक कीर्तीचे विक्रमवीर डॉ दिनेश गुप्ता यांनी सांगितले की , पुरस्कार मिळो किंवा न मिळो आपण आपल्यातील सृजनतेचा आविष्कार सातत्याने सुरु ठेवला पाहिजे. प्रत्येक पुस्तक त्याची निर्मिती आणि वाचन हा एक आविष्कार आहे.

कार्यक्रमाचे सुरुवातीला अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उपक्रमाचे संकल्पनाकार योगेश जोशी यांनी गेल्या तीन वर्षात अखंड वाचनयज्ञ उपक्रमाला वाचकांचा वाढता प्रतिसाद कसा मिळत गेला हे सांगितले. तसेच सलग ३६ तास आणि एकत्रित ३०० वाचन या उपक्रमात कसे झाले यामागची संकल्पना समजावून दिली. तसेच वर्षभरातील अखंड वाचनयज्ञ उपक्रम आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात जयंत भावे लिखित प्रतिबिंब या काव्यसंग्रहाचे आणि योगेश जोशी यांच्या वंद्य वंदे मातरम् या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अक्षरमंच प्रकाशनाचे वतीने आणि बल्लाळ प्रकाशनाचे सहकार्याने प्रकाशित करण्यात आलेल्या वंद्य वंदे मातरम् या पुस्तकांच्या २५००० प्रती विविध विद्यार्थी आणि युवक यांना विनामूल्य वितरित करण्यात येणार असल्याचे संस्था सचिव हेमंत नेहते यांनी सांगितले.

यावेळी अक्षरमंच प्रतिष्ठानचे सोबत माऊली एक शैक्षणिक ध्यास, ठाणे वैभव, सुस्वर क्रिएशन्स यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वाचू आनंदे या पुस्तक परीक्षण उपक्रमाचा, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था आयोजित दिवाळी अंक आणि काव्य वाचन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन सुकन्या जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हेमंत नेहते, मंदार धर्माधिकारी, डॉ सुनील खर्डीकर, दया भिडे, प्रा शैलेश रेगे, प्रा गजेंद्र दीक्षित, गीता जोशी, पुंडलिक पै, आरती मुळे, भालचंद्र घाटे, मुग्धा घाटे, तुषार राजे, प्रा प्रकाश माळी, निखिल बल्लाळ, मीनल जोशी, कैलास सरोदे, प्रदीप जोशी, मच्छिंद्र कांबळे, रवींद्र कनोजे यांनी विशेष सहकार्य केले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande