रिनोव्हेशन क्षेत्रात परदेशी रोजगार; रायगड जिल्ह्यासाठी मोठी घोषणा
रायगड, 8 डिसेंबर (हिं.स.)। शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी इस्त्राईलमध्ये नूतनीकरण (रिनोव्हेशन) बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा
रिनोव्हेशन क्षेत्रात परदेशी रोजगार; रायगड जिल्ह्यासाठी मोठी घोषणा


रायगड, 8 डिसेंबर (हिं.स.)। शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी इस्त्राईलमध्ये नूतनीकरण (रिनोव्हेशन) बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त अ. मु. पवार यांनी दिली.

या भरती अंतर्गत विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. प्लॅस्टरिंग कामासाठी १००० जागा, सिरेमिक टाइल्स लावणीसाठी १००० जागा, ड्रायवॉल कामगारांसाठी ३०० जागा आणि मेसन (गवंडी) पदासाठी ३०० जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. उमेदवारांना इंग्रजी वाचन, लेखन व संभाषणाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे. अंतर्गत नूतनीकरण कामे, जुन्या इमारतींची दुरुस्ती, संरक्षण व उन्नतीकरण कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वयोमर्यादा २५ ते ५० वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना अंदाजे प्रतिमहिना १ लाख ६२ हजार ५०० रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे. महिन्याला सुमारे १८२ तासांचे काम असून २१ ते २६ दिवस कामाचे असतील. निवासाची व्यवस्था नियोक्त्याकडून करण्यात येणार असली तरी अन्नाची व्यवस्था उमेदवाराने स्वतः करायची आहे. वैद्यकीय विमा नियोक्त्याकडून दिला जाणार असून अतिरिक्त कामासाठी ओव्हरटाईम कंपनीच्या नियमांनुसार देण्यात येणार आहे.

पहिला व्हिसा वर्षाअखेरपर्यंत वैध राहील व त्यानंतर दरवर्षी नूतनीकरण होऊ शकते. कमाल करार कालावधी ६३ महिने इतका ठेवण्यात आला आहे. कामाचे ठिकाण संपूर्ण इस्त्राईलमधील विविध भाग असतील. पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (PCC) बंधनकारक असून व्हिसासाठी वैद्यकीय तपासणी उमेदवाराने स्वतः करून घ्यायची आहे.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी https://maharashtrainternational.com शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande