
पालघर, 8 डिसेंबर (हिं.स.)पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव भयावह पातळीवर पोहोचला असून मागील वर्षभरात तब्बल ९८०५ नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत चालल्याने नागरिकांत मोठी भीती पसरली आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील आकडेवारीनुसार, जव्हार ३६६, विक्रमगड ३०९, मोखाडा ३४०, वाडा ११५५, डहाणू १४१५, तलासरी ४९०, पालघर २९०५ आणि वसई २८०५ नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले आहेत. याशिवाय इतर प्राण्यांच्या चाव्यांची ३०९८ प्रकरणे नोंदली गेली आहेत.
या वाढत्या हल्ल्यांची गंभीरता आणखी अधोरेखित करणारी घटना म्हणजे पालघर तालुक्यातील माहीम परिसरातील हरणवाडी येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा रेबीजने झालेला मृत्यू. दोन महिन्यांपूर्वी तिच्या सोसायटीत एका भटक्या कुत्र्याचे नख लागले होते. त्यानंतर तिची प्रकृती बिघडत गेली आणि २ डिसेंबर रोजी तिने प्राण सोडले. ही घटना जिल्ह्यातील आरोग्य व नागरी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे करते.
नागरिकांचा आरोप आहे की प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांत रेबीज लसीचा पुरेसा साठा अनेकदा उपलब्ध नसतो. प्रशासनाकडून साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात रुग्णांना लस मिळण्यास अडथळे येतात, अशी तक्रार वारंवार पुढे येत आहे.
पालघर शहर व इतर तालुक्यांत रस्त्यावर अचानक आडवे जाणाऱ्या किंवा झुंडीने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत. दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात येत असून काहींना गंभीर दुखापती सोसाव्या लागल्या आहेत. अपघातात जखमी झालेली कुत्री वेदनांनी त्रस्त होऊन अधिक आक्रमक बनतात आणि लहान मुलांवर हल्ला करण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत.नागरिकांनी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण, लसीकरण मोहिमा आणि आश्रय केंद्रे उभारणे यासारखे ठोस उपाय तातडीने राबवावेत, अशी मागणी केली आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप प्रभावी उपाययोजना न राबवल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL