
जळगाव, 8 डिसेंबर (हिं.स.) | पाचोरा तालुक्यासह परिसरात प्लॉट व बांधीव घरे देण्याचा बनाव करत लाखोंची फसवणूक करुन पसार झालेल्या भामट्यास पाचोरा पोलिसांनी चाळीसगाव येथून ताब्यात घेतले आहे. राहुल साहेबराव महाजन (३६) रा. चांबरुड बु. ता. भडगाव असे या आरोपीचे नाव आहे.
राहुल महाजन व त्याचा भाऊ योगेश साहेबराव महाजन यांनी पाचोरा शहरातील पुनगाव रोडवर मॅक्स्गेन बाजार नावाने ऑफिस सुरु केले होते. राहुल महाजन हा लोकांशी जवळीक साधुन त्यांचा विश्वास संपादन करुन प्लॉट विक्री व नविन घरे बांधुन देण्याच्या नावाखाली अनेकांकडुन या माध्यमातून लाखो रुपये जमा करीत होता.
अजय सुरेश करवंदे रा. पिंपळगाव (हरेश्वर) यांना राहुल महाजन याने विश्वासात घेत तुम्हाला पुनगाव रोडवर ३६ लाखाचे रो हाऊस घेवुन देतो असे सांगितले. त्याच्या आमिषाला बळी पडुन अजय करवंदे यांनी राहुल महाजन यांना २०२३ मध्ये बँकेचे कर्ज काढुन २२ लाख ४० हजार रुपये ऑनलाईनव रोख स्वरूपात राहुल महाजन याला वेळोवेळी दिले होते. दोन वर्ष उलटुन ही घर मिळत नाही म्हणुन करवंदे यांनी राहुल महाजन याच्याकडे पैशांचा तगादा लावला असता राहुल महाजन याने करवंदे यांना ६ लाख रुपये व ६ लाख ५० हजार रुपये असे दोन धनादेश त्यावर दिनांक टाकलेली नव्हती.
अजय करवंदे यांनी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी राहुल महाजन याच्या विरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. तपास दरम्यान राहुल महाजन हा चाळीसगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोबाइल लोकेशनवरुन बिलाखेड बायपास जवळुन राहुल महाजन यास ताब्यात घेत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आणले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर