
रायगड, 8 डिसेंबर (हिं.स.)। जयेंद्र भगत पुरस्कृत आणि ग्रामस्थ मंडळ वडगाव यांच्या वतीने आयोजित स्व. काशिनाथ भगत व स्व. बाळू थळे स्मृती चषक कबड्डी स्पर्धा श्री स्वामी दत्तनाथ चैतन्यधाम ट्रस्ट, रसाणी टेकडी येथे उत्साहात संपन्न झाली. या रंगतदार कबड्डी स्पर्धेत शिवाई बांधण संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जय भवानी वाशी संघावर मात करून प्रथम क्रमांक पटकावला. उपविजेतेपदास जय भवानी वाशी संघाला समाधान मानावे लागले, तर नूतन हनुमान ढवर संघाने तृतीय आणि जय हनुमान वायशेत संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत एकूण १६ निमंत्रित संघांनी सहभाग नोंदवला होता. सामने अत्यंत चुरशीचे झाले. वायशेत संघाच्या विनीत म्हात्रे यांना उत्कृष्ट चढाईसाठी गौरविण्यात आले, तर उत्कृष्ट पकडीसाठी वाशी संघाच्या कौस्तुभ पाटील यांना सन्मान मिळाला. पब्लिक हिरो ढवर संघाच्या सिद्धेश पाटील यांची विशेष कामगिरी ठरली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवाई बांधण संघाच्या राज जंगम यांची निवड करण्यात आली.
विजेत्या आणि उपविजेत्या संघांना वडगावचे माजी सरपंच जयेंद्र भगत आणि जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, माजी सदस्य संजय पाटील, सरपंच सारिका पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे निरीक्षक म्हणून जनार्दन पाटील यांनी काम पाहिले, तर सुनील थळे, नरेश कडू आणि प्रवीण भगत यांनी समालोचन केले. या क्रीडा महोत्सवाला ग्रामस्थ व क्रीडाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके