
धुळे, 8 डिसेंबर (हिं.स.) साक्री तालुक्यातील गणेशपूर परिसरात कांद्याने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह ६० फूट खोल विहिरीत कोसळला. ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या लहान मुलांसह संपूर्ण ट्रॉली पाण्यात कोसळल्याने गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेशपूर शिवारात कांदा चाळीत ट्रॉलीमध्ये कांदे भरण्याचे काम सुरू होते. मजुरांची काही मुले ट्रॅक्टरवर खेळत असतानाच भरलेला ट्रॅक्टर अचानक सुरू झाला आणि काही अंतरावर असलेल्या विना-कठड्याच्या खोल विहिरीत जाऊन पडला. पाणी तुडुंब भरलेल्या या सुमारे ६० फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर आणि मुले दोघेही पडले. गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे दोन वर्षांची परी संदीप गायकवाड हिला जिवंत बाहेर काढण्यात यश आले. मात्र खुशी दाजू ठाकरे (३) आणि ऋतिका संदीप गायकवाड (३) या दोन चिमुकल्या पाण्यात बुडल्याने त्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. विहिरीतील पाणी पंपाद्वारे उपसण्याचे काम सुरू असून बचावकार्य गतीने करण्यासाठी जेसीबीही पाचारण करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांसह पोलिस प्रशासनाकडून बेपत्ता बालिकांचा शोध युद्धपातळीवर सुरू असला तरी अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर