
- सामोपचाराने वाद मिटवण्याचा संदेश
रायगड, 8 डिसेंबर (हिं.स.)। कौटुंबिक कलह आणि वैवाहिक वाद सामंजस्याने सोडवण्याच्या उद्देशाने कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथे नुकतेच ‘मध्यस्थी जन-जागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून न्यायालयाबाहेर वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी ही प्रक्रिया किती प्रभावी व उपयुक्त आहे, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश सुभाष काफरे होते. यावेळी नवी मुंबई कोर्ट बार संघटनेचे उपाध्यक्ष संदीप रामकर व सचिव विकास म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षित मध्यस्थ ॲड. मोहित मोकल यांनी प्रस्ताविक करत मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व, फायदे आणि कौटुंबिक वादांमध्ये तिची गरज स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘मध्यस्थी’ विषयावर आधारित लघुनाटिका. नवरा-बायकोतील वाद, त्याचा मुलांवर आणि कुटुंबावर होणारा परिणाम, तसेच मध्यस्थी प्रक्रियेद्वारे समंजस तोडगा कसा काढला जातो, हे या नाटिकेत प्रभावीपणे सादर करण्यात आले. या नाटिकेत ॲड. वंदना दळवी, शोभा पाटील, संध्या सावंत, कृष्णा पवार, प्रसाद मढवी, विशाखा जाधव, किरण भोसले, तसेच कांचन किरवे व राज निकम यांनी भूमिका साकारल्या.
कार्यक्रमात सहभागी कलाकारांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाला सुकून प्रकल्पाच्या समुपदेशक सोनल बंदबे, तालुका विधी सेवेचे कर्मचारी, विधीज्ञ आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे ‘मध्यस्थी’च्या माध्यमातून वाद सामंजस्याने मिटवण्याचा प्रभावी संदेश समाजात पोहोचला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके