पालघर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा दुर्दैवी मृत्यू
पालघर, 8 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात वाहनांच्या बेफाम वेगामुळे भीषण अपघातांची मालिका वाढत असून रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित दोन्ही प्रकरणांत पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढ
वाहनांच्या बेफाम वेगाला दोन बळी; पालघर जिल्ह्यात दोन अपघातांत दुर्दैवी मृत्यू


पालघर, 8 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात वाहनांच्या बेफाम वेगामुळे भीषण अपघातांची मालिका वाढत असून रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित दोन्ही प्रकरणांत पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

पहिली घटना मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हालोली गावठाण पाडा परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात आलेल्या धरूम स्टाईल बीएमडब्ल्यू बाईक (एमएच 48 सीके 320) ने रस्ता ओलांडत असलेल्या शारदा जनार्दन पानरा (78) या वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली.

या प्रकरणी वसई येथील बाईक चालक विनायक नायकर याच्याविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात बाईक अतिवेगात चालवल्यामुळेच अपघात झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, दुसरी घटना जव्हार–नाशिक राज्य मार्गावरील निरपामाळ येथील वळणावर घडली. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या थार जीपने स्कुटीला जबर धडक दिल्यामुळे अपघात झाला. अपघातात स्कुटीस्वाराचा मृत्यू झाला असून जीप चालका विरोधात जव्हार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील महामार्ग आणि प्रमुख मार्गांवर वाढत्या वाहनतळ तसेच बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे अपघातांचे प्रमाण सतत वाढत आहे. वृद्ध, महिला आणि दुचाकीस्वार हे सर्वाधिक धोक्यात असल्याची चिंता नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अतिवेग, स्टंटबाजी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात अपघातातील मृत्यूंची संख्या कमी न होता अधिक वाढताना दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande