
नवी दिल्ली, ८ डिसेंबर (हिं.स.) ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने FIDE सर्किट २०२५ चे विजेतेपद जिंकून कॅंडिडेटस टूर्नामेंट २०२६ मध्ये आपले स्थान निश्चित केले. यासह पुढील वर्षीच्या कॅंडिडेटस टूर्नामेंटमध्ये तो एकमेव पुरुष भारतीय बुद्धिबळपटू असणार आहे.
प्रज्ञानंदासाठी आतापर्यंत हे वर्ष उत्कृष्ट राहिले आहे. त्याने अनेक प्रतिष्ठित जागतिक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये अपवादात्मक कामगिरी केली आहे. टाटा स्टील मास्टर्स, सुपरबेट चेस क्लासिक रोमानिया, उझबेक चेस कप मास्टर्स आणि लंडन चेस क्लासिक ओपन सारखे विजेतेपद पटकावलेले. त्याने स्टेपन अवग्यान मेमोरियलमध्ये दुसरे आणि सिंकफील्ड कपमध्ये १२ वे स्थान मिळवले होते.
अलीकडेच संपलेल्या FIDE वर्ल्ड कपमध्ये, प्रज्ञानंद चौथ्या फेरीत पोहोचला होता. असे असूनही, संपूर्ण हंगामात त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो FIDE सर्किट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला. आणि याचा त्याला २०२६ कॅंडिडेटस टूर्नामेंटसाठी थेट फायदा झाला.
आतापर्यंत, २०२६ कॅंडिडेट्स स्पर्धेसाठी आठपैकी सात जागा भरल्या गेल्या आहेत. प्रज्ञानंद व्यतिरिक्त, अनिश गिरी, फॅबियानो कारुआना, मॅथियास ब्लूबॉम, झावोखिर सिंदारोव्ह, वेई यी आणि आंद्रेई एसिपेंको यांनीही या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
आठवे आणि अंतिम स्थान सर्वोच्च सहा महिन्यांचे सरासरी रेटिंग असलेल्या बुद्धिबळपटूला दिले जाणार आहे. हे रेटिंग १ ऑगस्ट २०२५ ते १ जानेवारी २०२६ पर्यंतच्या FIDE मानक रेटिंग यादीच्या आधारे निश्चित केले जाईल. पात्र होण्यासाठी, खेळाडूने १ फेब्रुवारी २०२५ ते १ जानेवारी २०२६ दरम्यान किमान ४० रेटेड सामने खेळलेले असावेत.
२०२६ कॅंडिडेट्स स्पर्धा मार्च ते एप्रिल दरम्यान आयोजित केली जाणार आहे. पुरुष गटात प्रज्ञानंदा हा भारताचा एकमेव पुरुष बुद्धिबळपटू पात्र ठरला आहे. तर दिव्या देशमुख, कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली या तीन भारतीय महिला बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेसाठी आधीच पात्रता मिळवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे