
पालघर, 8 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात परतीचा पाऊस यंदा समाधानकारक झाला असला तरी डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच काही भागातील नद्या आणि नाले कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. विक्रमगड, जव्हार, मोखाडा भागात नदी-नाल्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने खाली येत असून येणाऱ्या दिवसांत पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे उघडे करून ठेवले जातात. मात्र, पावसाळा संपूनही बंधाऱ्यांचे दरवाजे वेळेवर बंद करण्यात आले नाहीत, अशी गंभीर तक्रार शेतकरी व्यक्त करत आहेत. बंधाऱ्यात पाणी अडविले की परिसरातील विहिरी, कुपनलिका आणि ओढ्यांतील पाण्याची पातळी वाढून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. यामुळेच नद्यांवरील दरवाजे तातडीने बंद करणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी वर्गाने नोंदविले आहे.
विक्रमगड तालुक्यातील देहरजे आणि पिंजाळ नद्या, तसेच दहा पेक्षा अधिक मोठ्या नाल्यांवर लघु पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाकडून कोल्हापूर पद्धतीचे (केटी) आणि सिमेंट बंधारे उभारलेले आहेत. महापुराचे पाणी अडवून जमिनीची ओल वाढवण्याचे काम हे बंधारे करतात. मात्र बंधाऱ्यांचे दरवाजे उघडे राहिल्याने पाणी थेट वाहून जात आहे, अशी शेतकऱ्यांची नाराजी आहे.
शेतकरी काशिनाथ भावर सांगतात,“बंधाऱ्यांचे दरवाजे अजूनही बंद झाले नाहीत. काही दिवसांत हे पाणी वाहून गेले तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मोठा पाणीसंकटकाळ निर्माण होईल. भाजीपाला, कलिंगड, टरबूज यांसारख्या पिकांची लागवड करण्यास मोठी अडचण येईल.”
बंधाऱ्यांची देखभालही ढिसाळ असल्याचे समोर आले आहे. विक्रमगड तालुक्यातील निम्म्याहून अधिक बंधाऱ्यांना गळती लागली असून, दुरुस्ती न केल्याने अडवलेले पाणीही टिकत नाही, अशी परिस्थिती आहे. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात उशिरा झालेल्या पावसाचा अंदाज चुकीचा ठरल्यानेही पाणी व्यवस्थापनावर परिणाम झाला.
येणाऱ्या काही दिवसांत बंधाऱ्यांचे दरवाजे बसवले नाहीत तर नाला-नद्यांतील काठचे पाणी पूर्णपणे आटण्याचा धोका निर्माण झाला आहे. रब्बी हंगाम जवळ येत असताना शेतकरी आणि ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL