
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील मरीआई चौकातील १०३ वर्षे पूर्ण झालेला ब्रिटीशकालीन रेल्वे पूल १४ डिसेंबर रोजी पाडण्यात येणार आहे.वर्षभर चालणाऱ्या या कामासाठी ८ डिसेंबरच्या रात्रीपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पूल पाडकामासाठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज होत आहे. या मार्गावरील वाहतूक 54 मीटर रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. मंगळवेढ्याहून देगाव पासून पुढे आल्यावर सीएनएस हॉस्पिटल पासून हा रस्ता लागतो. या रस्त्यावरून डावीकडे वळण घेऊन जुना पुणे नाका येथे सोलापूर बस स्थानक व पुणे महामार्गाशी हा रस्ता जोडला जाणार आहे. मरीआई चौक दमानी नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आता शेटे वस्ती येथील रेल्वे पुलाखालून खमीतकर अपार्टमेंट, जुनी पोलीस लाईन मार्गे जावे लागणार आहे. या काळात आता नागरिकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे. रेल्वे पूल पाडकामामुळे भैया चौकातून मंगळवेढाकडे होणारी मोठी वाहतूक काही दिवस विस्कळीत होणार आहे. कोल्हापूर महामार्ग विस्तारीकरण व रेल्वेचे विस्तारीकरण कामासाठी 103 वर्षाचा हा ब्रिटिश कालीन पूल आता पाडण्यात येणार आहे. यामुळे 14 डिसेंबर पासून रेल्वे सेवा ही विस्कळीत होणार आहे. या कामामुळे बऱ्याच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रणाद्वारे हा पूल लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड