
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केला आहे. मात्र उर्वरित 16 साखर कारखान्यानी शासनाने कळवून, बैठक होऊन ही ऊस दर अद्याप जाहीर केला नाही. ज्या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आहे त्यांनी सरासरी 2 हजार 800 रुपये प्रमाणे जाहीर केला आहे. तो शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. कारण चालू वर्षी रासायनिक खताचे वाढते दर, वाढती मजुरी, ट्रॅक्टर व बैलाचे वाढलेले भाडे, शासनाची वाढलेली पाणीपट्टी यांचा हिशोब घातला तर जाहीर केलेल्या ऊस दराबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. पहिली उचल किमान 3 हजार 200 ते 3 हजार 500 मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.उजनी डावा कालवा, आष्टी तलाव, आष्टी व शिरापूर उपसा सिंचन योजना या पाणी स्त्रोता मुळे मोहोळ तालुक्यातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. प्रत्येक तालुक्यातील विविध पाणी स्तोत्रा मुळे ही उसाचे क्षेत्र वाढले आहे. गेल्या वर्षी कारखानदारांनी उसाला 2 हजार 800 ते 2 हजार 900 रुपये दर दिला आहे. चालू वर्षी वरील प्रमाणे उत्पादन खर्चात मोठी वाढ होऊन ही गेल्या वर्षी एवढाच दर, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सीना व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांचे पुरामुळे उसाचे मोठे नुकसान झाले आहे, हा सर्व हिशोब केला तर 2 हजार 800 रुपये दर कोणत्या गणितात बसतो हे शेतकऱ्यांना न सुटणारे कोडे आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड