
मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.)
- राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सुधाकर बापुराव तेलंग यांना महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग आयुक्त, पुणे या पदाची शपथ दिली.
या कार्यक्रमास कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंग, माजी आयुक्त दिलीप शिंदे, सचिव वैशाली चव्हाण, तसेच माजी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते. निवृत्त वरिष्ठ अधिकारी उदय पाटील आणि भगवान गावडे यांनीही नवीन आयुक्तांचे अभिनंदन केले. माजी आयुक्त दिलीप शिंदे यांनी आयुक्त तेलंग यांचे स्वागत करत, आयोगाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव म्हणाले की, सेवाकालावधीत जी लोकसेवा केली, त्याच कार्याची पुढील साखळी म्हणजे राज्य सेवा हक्क आयोग होय. या कामकाजात सर्व शासकीय विभाग आणि कर्मचाऱ्यांशी सातत्याने संबंध येत असतो. या जबाबदाऱ्या तेलंग अत्यंत दक्षता आणि कसोशीने पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संविधानातील मूल्यांची जपणूक करत नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही तेलंग यांनी दिली. राज्य सेवा हक्क आयोग ही लोकसेवेची अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे, सेवा वेळेत उपलब्ध करणे आणि शासकीय विभागांमध्ये जबाबदारी व पारदर्शकता वाढवणे प्राधान्य राहील. आगामी कार्यकाळात सर्वोत्तम काम करेल. असे तेलंग यांनी म्हटले.
राज्य सेवा हक्क आयोग नागरिकांना निर्धारित कालावधीत शासकीय सेवा उपलब्ध होत आहेत का याची देखरेख करते. तक्रारींची सुनावणी व विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. शासकीय विभागांना सुधारणा सुचवणे व प्रक्रियेत पारदर्शकता राखणे तसेच सेवा हमी कायद्यांतर्गत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्य करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी