
रायगड, 8 डिसेंबर (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी केले.
या प्रकरणाच्या तपासासाठी रायगड येथील पोलीस अधीक्षक ॲचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिंदे आणि कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले होते.
शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुजरात व नाशिक परिसरात तपासाची चक्रे फिरवून अखेर दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी मुख्य आरोपी अविनाश जगन्नाथ माकोडे याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीकडून देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरलेली सीबीझेड मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. यापूर्वीही आरोपीवर गंभीर स्वरूपाचे तब्बल १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुशील काजरोळकर, व सुशांत वरक, पो. ह. स्वप्निल येरुणकर (क्र. १०८८), पो.ह. सचिन वाघमारे (क्र. २३८४), पो. शि. आर.बी. केकाण (क्र. १८३६), पो.शी. आश्रुबा बाप्पाजी बेंद्रे (क्र. ४६७) आणि पो. शी. विनोद रंगराव वांगणेकर (क्र. १४१५) यांनी धाडसी कामगिरी बजावली.
दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी नेरळ-धामोते रस्त्यावर ही घटना घडली होती. या घटनेत फिर्यादी जखमी झाला होता. आरोपींनी देशी बनावटीच्या कट्ट्याने गोळीबार करून मोटारसायकलवरून पलायन केले होते. घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे आणि शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके