
बीड, 8 डिसेंबर (हिं.स.)।
गाडीला धडक देऊन दोन लाख वीस हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लुटून नेण्याची घटना परळी जवळ घडली.
परळी ते धारावती तांडा रोडवर घरी जाणाऱ्या तरुणाच्या गाडीला धडक देऊन चाकूचा धाक दाखवून डोळ्यात चटणी टाकून २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ४ जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांकडून झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धारावती तांडा येथील यशवंत प्रेमदास पवार हे परळीवरून धारावती तांड्याकडे दुचाकीवरून जात होते.
यावेळी काळरात्री देवी मंदिर रोडवर दोन दुचाकीवरून आलेल्या चार आरोपींनी त्यांचा पाठलाग करत अचानक धडक दिली. तोंडाला मास्क लावून त्यापैकी एकाने चाकू दाखवून धमकावले. तर दुसऱ्याने त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना धरून ठेवले आणि क्षणात त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची सोन्याची चैन आणि एक तोळ्याच्या दोन अंगठ्या हिसकावून चोरटे घेऊन पसार झाले. परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक मजहर सय्यद हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis