
अमरावती, 8 डिसेंबर (हिं.स.) | जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी बांधव व मका उत्पादक शेतकऱ्यांची सहा दिवसांची पायदळ पदयात्रा परतवाडा येथून सुरू झाली. सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या यात्रेत शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले असून नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडक देण्यासाठी ते १९० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
या पदयात्रेतून मका पिकाला २,४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव, आदिवासी बांधवांना लाकूड कामगारांचे प्रमाणपत्र, तसेच पाणी, वीज, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. नागपूर येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
मेळघाटातील आदिवासी भागात दीर्घकाळापासून अडचणी वाढल्या असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला न्याय मिळावा व विकासाच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी हा पायदळ मार्च निघाला आहे. सहा दिवसांच्या प्रवासानंतर पदयात्री नागपूरमध्ये दाखल होणार असून या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी