
— स्थानिक गुन्हे शाखेची चमकदार कामगिरी
पालघर, 8 डिसेंबर (हिं.स.)। मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत वैतरणा धरण परिसरातून सापडलेल्या अज्ञात प्रेताच्या तपासाचा गुंता उकलत पालघर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सूडाच्या वादातून झालेल्या या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून केला असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
१२ जुलै २०२५ रोजी कासा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार वैतरणा धरणाजवळ पाण्यात एक प्रेत दिसल्याची खबर मिळाली. मोखाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, एका अनोळखी इसमाचे दोन्ही पाय जंगली वेलीने बांधलेले अत्यंत संशयास्पद प्रेत सापडले. त्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत व्यक्तीची ओळख शरद कोंडाजी बोडके (वय अंदाजे ३७), रा. मोहाळे, ता. इगतपुरी, जि. नाशिक अशी पटली. चौकशीवरून मृत्यू हा अपघाती नसून खून असल्याची माहिती पुढे आली. त्यावरून १३ ऑगस्ट रोजी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १५७/२०२५ भा.दं.वि. कलम ३०२, ३४, २०१ नुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार केली. तांत्रिक तपास, सखोल चौकशी आणि माहितीच्या आधारे पाच आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला. आरोपींमध्ये संतोष उर्फ अरुण लक्ष्मण धात्रक (३६), शिवराम लक्ष्मण वाघ (२९), गोकळ पांडुरंग बेंडकोळी (२९), गणेश बाळू बेंडकोळी (२२), संजय संपत पोटकले (३०) यांचा समावेश आहे.मृत शरद बोडके हा आरोपी संतोष धात्रक याला जमीन वादासह विविध कारणांनी सतत त्रास देत होता. त्याने आरोपीच्या आई-वडिलांना मारहाण केली होती. त्याचा सूड घेण्यासाठी सर्व आरोपींनी एकत्र येऊन योजना आखली. त्यांनी बोडके यास दारू पाजून स्विफ्ट डिझायर (एमएच १५ जे डब्ल्यू ०८०७) वाहनातून निर्जन ठिकाणी नेऊन गळा आवळून त्याचा खून केला. ही कारवाई स्थानीय गुन्हे शाखा, पालघर यांनी सपोनी प्रेमनाथ ढोले यांच्या नेतृत्वाखाली केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL