
छत्रपती संभाजीनगर, 8 डिसेंबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला स्वातंत्र्य चळवळीत विशेष स्थान असून, भारतीय जनतेला प्रेरणा देणारे हे गीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिले गेले असे मानले जाते. 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत प्रथम गायले. स्वातंत्र्य संग्रामाच्या अनेक ऐतिहासिक क्षणांमध्ये या गीताने राष्ट्रीय भावना जागृत केल्या. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेत तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी वंदे मातरम् ला राष्ट्रगीतातील ‘जन गण मन’ प्रमाणेच सन्मानाचा दर्जा असल्याचे जाहीर केले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हा उपक्रम 7 ते 14 नोव्हेंबर 2025, 19 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026, 7 ते 15 ऑगस्ट 2026 (हरघर तिरंगा अभियान) व 1 ते 7 नोव्हेंबर 2026 (समारोप) या चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. दिनांक 24 ऑक्टोबर, 2025 तसेच 04 नोव्हेंबर, 2025 रोजी झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्राने कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली असून, त्यानुसार जिल्हास्तरावर व्यापक कार्यवाही करण्यात येणार आहे. यानुसार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता देशभर सामूहिक गायन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, तहसील स्तरावरील केंद्रे, पोलीस विभाग, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, नागरिक हे सर्व सामुदायिक गायनात सहभागी झाले होते. तसेच प्रधानमंत्री यांचा कार्यक्रमही थेट प्रक्षेपित करण्यात आला आहे. .
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis