‘वन्दे मातरम्’ला तोडणे हे काँग्रेसचे पाप ! - फडणवीस
नागपूर, 8 डिसेंबर (हिं.स.) - ‘वन्दे मातरम्’ला ७ नोव्हेंबर या दिवशी १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हिवाळी अधिवेशनात या गीताचे गायन करण्यात आले. उद्धव ठाकरे गटाने त्यावरूनही राजकारण केले. त्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की
मुख्यमंत्री फडणवीस


नागपूर, 8 डिसेंबर (हिं.स.) - ‘वन्दे मातरम्’ला ७ नोव्हेंबर या दिवशी १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हिवाळी अधिवेशनात या गीताचे गायन करण्यात आले. उद्धव ठाकरे गटाने त्यावरूनही राजकारण केले. त्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘वन्दे मातरम्’वर कधीच बंदी नव्हती. जो काही अवमान झाला, त्याला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव संमत करून ‘वन्दे मातरम्’ला तोडले आणि फक्त अर्धेच गीत गायले जाईल, असे केले. आज ज्या काँग्रेसोबत ठाकरे गळ्यात गळे घालून फिरतात, त्यांनाच हा प्रश्न विचारायला हवा. भाजपाच्या काळात मात्र ‘वन्दे मातरम्’चा नेहमी सन्मान झाला असल्याचे फडणवीस म्हणाले. विधानभवनात ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘वन्दे मातरम्’ हे केवळ गीत नाही, तर ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि राष्ट्रवादाचा मंत्र आहे. कित्येक क्रांतिकारकांनी फाशी स्वीकारतानाही ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा दिल्या. या महामंत्राने सामान्य जनतेला स्वातंत्र्यलढ्याशी जोडले. आज आमच्या विधानसभेतही आम्ही पूर्ण ‘वन्दे मातरम्’ गाऊन या गीताला वंदन केले. पुढच्या अधिवेशनात विधानसभेतही यावर चर्चा होईल, असे अध्यक्षांनी घोषित केले आहे.

शिवसेनेचे आमदार भाजपात घेऊन काय करू?

शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचे आहे? मित्रपक्षाचे आमदार घेण्याचे राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. भविष्यात शिवसेना, भाजप आणि आमची महायुती आणखी मजबूत होताना दिसेल, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विधानभवनात माध्यमांशी बोलतांना शिवसेनेचे (शिंदे) २२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. त्यावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, उद्या कोणी असाही दावा करू शकते की, उबाठाचे २० आमदार भाजपमध्ये येत आहेत. असले दावे करून काही होत नाही. आम्हाला शिवसेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे ? आम्ही मित्रपक्ष मजबूत करण्यासाठी काम करतो, त्यांना कमकुवत करण्यासाठी नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande