
परभणी, 8 डिसेंबर (हिं.स.)।
माजी सभापती महेमूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली आज मरीआई मंदिर ते धार रोड कॅनॉल तसेच खंडोबा बाजार ते महाराणा प्रताप पुतळा या मार्गावरील सुरू असलेल्या रोड कामातील विलंब व निकृष्ट दर्जाविरोधात कामबंद आंदोलन करण्यात आले.
सदर रस्त्यांसाठी सुमारे 60 कोटी रुपयांचा निधी 2022 मध्येच मंजूर झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र निधी मिळूनही काम गेली तीन वर्षे संथ गतीने सुरू असून, कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत असून, वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
या सर्व अडचणींमुळे आज कामबंद आंदोलन करत कॉन्ट्रॅक्टरची कानउघडणी करण्यात आली. रोड कामे वेळेत, नियोजनबद्ध पद्धतीने आणि उच्च दर्जाने करण्यात यावीत, अशी ठाम मागणी यावेळी मांडण्यात आली.
आंदोलनात विशाल बुधवंत, एहसान खान, महमूद खान मित्र मंडळ, एहसान खान मित्र मंडळ, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि त्यांनी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis