अधिवेशन संपताच महापालिका निवडणुकीचा बिगुल
आगामी 15 डिसेंबरनंतर आचारसंहितेची शक्यता नागपूर, 08 डिसेंबर (हिं.स.) : राज्यातील हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. आगामी 15 डिसेंबरनंतर कधीही निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती भाजपमधील वरिष
निवडणूक लोगो


आगामी 15 डिसेंबरनंतर आचारसंहितेची शक्यता

नागपूर, 08 डिसेंबर (हिं.स.) : राज्यातील हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. आगामी 15 डिसेंबरनंतर कधीही निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

राज्यातील एकूण 20 जिल्हा परिषदांपैकी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा तसेच नागपूर व चंद्रपूर या दोन महापालिका निवडणूक प्रक्रियेतून वगळल्या जातील. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या महापालिका प्रथम घेण्याचा सल्ला दिल्यानंतर राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेचा क्रम बदलावा लागला. अन्यथा नगर पंचायत व नगर परिषद निवडणुकांनंतर जिल्हा परिषद निवडणुका घेण्याची सरकारची पूर्वतयारी होती.सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिका निवडणुका 20 जानेवारीला, तर जिल्हा परिषद निवडणुका मार्चअखेर घेण्याची शक्यता आहे.

मतदान घटण्याची शक्यता

जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानाचा टक्का घटण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, 9 फेब्रुवारी रोजी बारावीची आणि 19 फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा होत आहे. या परीक्षांसाठी वर्षभर विद्यार्थी व पालक मेहनत घेत असतात. परीक्षेनंतर कुटुंबीय सहलीला किंवा बाहेरगावी जाण्याचा कल वाढतो. परिणामी, मतदानात घट होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande