
परभणी, 8 डिसेंबर (हिं.स.)। गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वझुर परिसरात गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत उपशासाठी वापरले जाणारे तराफे व इतर साहित्य नष्ट केले.
स्थानिक गुन्हा शाखेचे पथक नियमित गस्त घालत असताना गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पाचारणावरून पथकाने तत्काळ कारवाई केली. या कारवाईदरम्यान अवैधरित्या वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे तराफे, बांबू, दोऱ्या तसेच इतर साहित्य जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले.
कारवाईमध्ये पोलिस अंमलदार लक्ष्मण कांगणे, परसराम गायकवाड आदी यांच्या पथकाचा विशेष सहभाग होता. अवैध वाळू उपशावर पोलिसांनी केलेल्या या निर्णायक कारवाईमुळे संबंधितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis